अंबरनाथ : कोरोनाची दुसरी लाट सरल्यानंतर अखेर सोमवारपासून व्यायामशाळा सुरू झाल्या आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी शरीरसौष्ठव खेळाडूंनी व्यायामशाळेत हजेरी लावली.
कोरोना वाढू लागल्यानंतर सगळ्या व्यायामशाळा बंद केल्या होत्या. मात्र, या निर्णयामुळे खेळाडूंच्या व्यायामाच्या सरावात खंड पडला. यामुळे अनेक खेळाडूंनी वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले. शरीरसौष्ठव हा खेळ अतिशय मेहनतीचा असून, वर्षभर अजिबात खंड पडू न देता सलग सराव आणि व्यायाम करून स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा लागतो. परंतु, कोरोनाच्या दोन वेळा लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे खेळाडूंचे मोठे नुकसान झाले तर दुसरीकडे केवळ व्यायामशाळेवर उपजीविका अवलंबून असलेल्या ट्रेनर्सवरही यामुळे संकट कोसळले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर व्यायामशाळा उघडताच खेळाडूंनी पुन्हा एकदा व्यायामशाळेत जाऊन सरावाला सुरुवात केली. तसेच इतर नागरिकांनीदेखील व्यायाम करण्यासाठी व्यायामशाळेत येण्यास सुरुवात केली आहे. यावेळी पुन्हा जर लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीच, तर व्यायामशाळा बंद न करता काही नियम आणि अटी लावून त्या सुरू ठेवाव्यात, अशी मागणी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी केली.
-----------