डोंबिवली : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठाकुर्ली उड्डाणपूल सुरू करण्यात येईल, असे आश्वासन खा. श्रीकांत शिंदे यांनी दिले होते, तरीही तो अद्याप खुला झालेला नाही. नेत्यांना निवडणुका आणि कार्यालयांची उद्घाटने करण्यासाठी वेळ असून नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी वेळ नाही का, असा सवाल करत डोंबिवली सायकल क्लबच्या सदस्यांनी रविवारी ठाकुर्ली उड्डाणपूल पश्चिमेकडून पूर्वेकडे पार केला आणि उड्डाणपुलाचा शुभारंंभ झाला, असे सांगत आनंद व्यक्त केला.सायकल क्लबचे पुष्कर जोशी म्हणाले की, शहरात वाहतूककोंडीची समस्या जटिल झाली आहे. त्यात हा पूल तयार होऊन १५ दिवस झाले, तरीही महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार केवळ लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याने उद्घाटन लांबले आहे. हे योग्य नाही. निवडणुका, पक्ष उपक्रम हे सुरूच राहणार, पण त्यासाठी नागरिकांना वेठीस का धरले जात आहे, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.सायकल क्लबच्या माध्यमातून दररविवारी शहरात आणि परिसरात सायकलफेरीचे आयोजन केले जाते. रविवारी क्लबने ठरवून उड्डाणपूल सर करत सायकलफेरीचा आनंद लुटला. त्यामध्ये क्लबचे संस्थापक डॉ. सुनील पुणतांबेकर, पुष्कर जोशी, देव गायकवाड, नितीन म्हात्रे, सारंग मुळेंसह असंख्य सदस्य उपस्थित होते. जोशी म्हणाले की, पूल तयार आहे, पण तरीही वापरण्यासाठी खुला नाही. काही दुचाकीस्वार तेथून येजा करण्याचा प्रयत्न करतात. पण, ते करू नये, यासाठी पुलाच्या तयार रस्त्याला भोकं पाडून त्यात सळयांचे जाळे बनवून पूर्वेचे प्रवेशद्वार बंद केले होते. हे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी महापालिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, मोठ्या नेत्यांना वेळ नाही तर ठीक आहे. त्यात आता आचारसंहिता लागणार, म्हणजे पुलाचे उद्घाटन काय जूनमध्ये करणार का? आता शुभारंभ झाला असता तर त्यातील त्रुटी सुधारता येणे शक्य झाले असते. पण, त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. यांच्या राजकारणासाठी नागरिकांना का वेठीस धरले जाते, ते योग्य नाही.
...अखेर ठाकुर्ली उड्डाणपूल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 6:38 AM