उल्हासनगर : गेले महिनाभर अंधारात राहणाऱ्या महिला निरीक्षणगृहातील विद्युत पुरवठा मनसेसह सामाजिक संघटनेच्या दबावामुळे महावितरण विभागाने सुरू केला. महिला व बाल कल्याण विभागाने विधुत थकबाकी बिल वेळेत न भरल्याने, महावितरण विभागाने महिला निरीक्षणगृहाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता.
उल्हासनगर कॅम्प नं-५ तहसील कार्यालय मागे महिला बाल-कल्याण विभागचे महिला सुधारगृह कार्यरत आहे. या सुधारगृहातील जवळपास ६० मुली गेल्या एका महिन्या पासून अंधारात राहत होत्या. विभागाकडून गेल्या ६ ते ७ महिन्याचे दीड लाखापेक्षा जास्त वीज बिल थकल्यामुळे, महावितरण विभागाने वीज पुरवठा खंडित केला. गेल्या एका महिन्यापासून पासून अंधारात राहणाऱ्या निरीक्षण गृहाचा विद्युत पुरवठा मंगळवार रोजी महावितरण विभागाने पूर्ववत केला. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी विभागाचा मुद्दा लावून धरून थेट शासन व संबंधित विभागाला टार्गेट केले. त्यानंतर विभागाला जाग येऊन धावपळ करीत महावितरण विभागाला विनंती करून विद्युत पुरवठा पूर्ववत केला.
शहरातील या महिला सुधारगृहात १८ वर्षाखालील मुलींना ठेवण्यात येते. सुधारगृहात मूलभूत सुविधेचा अभाव आहे. अशावेळी विधुत पुरवठा खंडित केल्याने, मुली गेली एक महिना कशा राहिल्या असतील, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. सुधारगृहाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच मुलींच्या सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय मध्ये तसेच महिला संरक्षण विभाग मध्ये, गेल्या ३० दिवसा पासून विद्युत पुरवठा खंडित केल्याने, विभागाचे सर्व कामकाज ठप्प पडले होते.