बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मुरबाडची म्हसा यात्रा ओळखली जाते. या यात्रेत सर्वात मोठा गुरांचा बाजार भरविला जातो. मात्र लंम्पी आजारामुळे जिल्हा प्रशासनाने गुरांच्या बाजारांवर बंदी घातली होती. या प्रकरणी आता राज्य शासनाने म्हसा यात्रेत गुरांच्या बाजाराला परवानगी दिली आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात म्हसा गावात खांब लिंगेश्वरची मोठी यात्रा भरविण्यात येते. म्हसा यात्रा म्हणून त्याची ओळख निर्माण झाली असून त्या ठिकाणी मोठा गुरांचा बाजार भरविला जातो. या गुरांचा बाजारात राज्यभरातील गुरे विक्रीसाठी येत असतात. लाखो - करोडोंची उलाढाल या गुरांचा बाजारात होत असतानाच लंम्पी सारख्या आजारामुळे या यात्रेतील गुरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली होती.
याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने आदेश देखील काढले होते. या आदेशाच्या विरोधात स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दाद मागितली होती. लंम्पी हा आजार ठाणे जिल्ह्यात कमी असल्यामुळे म्हसा यात्रेत गुरांचा बाजार भरवण्याची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. अखेर पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हसा यात्रेतील गुरांच्या बाजाराला परवानगी दिली आहे.
''राज्यभरातील गुरे या ठिकाणी बाजारात खरेदी विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे हा बाजार भरावा ही आपली प्रामाणिक मागणी होती. शासनाने देखील या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे आपल्या मागणीला यश आले." - किसन कथोरे, आमदार