मीरारोड - नियमांचे उल्लंघन करून मीरा भाईंदर महापालिकेने रोड सेफ्टी जनजागृतीपर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचा हवाला देत एका संस्थेस तब्बल ५ महिने नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान फुकट आंदण दिले. लोकमतने बातम्या दिल्या नंतर क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन सामना पुढे ढकलल्याचे म्हटले. मात्र आता मैदानातील लाकडी स्टेडियम आदींचा गाशा संस्थेने गुंडाळल्याने क्रिकेट सामना होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराची फसवणूक असून संबंधितांकडून ५ महिन्यांचे भाडे वसूल करा व अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी होत आहे.
सुभाषचंद्र बोस मैदान हे महापालिकेने वांद्रे-कुर्ला संकुलातील मॅजेस्टिक लिजेन्ड्स स्पोर्ट्सला सेलिब्रिटी क्रिकेट सामन्यासाठी ३० मे ते २० जून अशा २२ दिवसांच्या भाड्याने विनामूल्य दिले. नंतर बोरीवली पूर्वेच्या रॉयल जिनियस स्पोर्ट्स प्रा. लि. या संस्थेच्या पत्रावरून महापालिकेच्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून बोस मैदान पुन्हा २१ जून ते ९ ऑक्टोबर पर्यंत विनामूल्य भाड्याने दिले. त्या दरम्यान संस्थेने मैदानात तात्पुरत्या स्वरुपात स्टेडियम, फ्लड लाइट, वातानुकूलित दालने, कॉमेंट्री बॉक्स आदी बनवले असल्याने शहरातील खेळाडूंना खेळण्यास मनाई केली गेली.
पूर्वीच्या आयुक्तांचे मैदान बाबतचे आदेश, एमआरटीपीमधील तरतुदी, शासन आणि न्यायालयातील भूमिकाचे उल्लंघन करून महापालिकेने नियमबाह्यपणे मैदान विनामूल्य भाड्याने देऊन जवळपास ५ महिने खेळण्यासाठी बंद केले आहे. लोकमतमधून याबाबत बातम्या येताच आयोजक, आरटीओचे रवी गायकवाड , महापालिका आयुक्त संजय काटकर आणि सामन्यात सहभागी होणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू यांनी जिसीसी आलिशान क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन 'रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज'चा एक उपक्रम अनुषंगाने होणारा सामना पुढे ढकलला असल्याचे जाहीर केले होते.
मात्र अजून पर्यंत सामना झाला नाहीच आता तर आयोजकांनी मैदानातील लाकडी स्टेडियम आदी सर्व काढून टाकले आहे. त्यामुळे ५ महिने मैदान फुकट भाड्याने घेऊन अडवून ठेवल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान केले, शहराची फसवणूक झाली व खेळाडूंना सुद्धा खेळता आले नाही असे आरोप होत आहेत.
आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त संजय काटकर यांना पत्र देऊन पालिकेची फसवणूक करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करा, त्यांच्या कडून मैदानाचे भाडे नियमानुसार वसूल करा अन्यथा शासनाला तक्रार करू असा इशारा दिला आहे. यात परिवहन विभागाच्या बड्या अधिकाऱ्याचा हात आहे असे सरनाईक म्हणाले. माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्ण गुप्ता यांनी देखील मैदान नियमबाह्य आणि फुकट भाड्याने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून आयोजकांनी पैसे भरले नाहीतर अधिकाऱ्यांच्या पगारातून भाडे वसूल करा अशी मागणी केली.