सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर भाजपा, शिंदेसेनेच्या नेत्यांनी टाऊन हॉल मध्ये बुधवारी एकत्र पत्रकार परिषद घेऊन जुन्या वादाला मूठमाती देत एकजुटीने प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिवसैनिक व पदाधिकारी आयलानी यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
उल्हासनगर भाजप-साई पक्षाच्या मेळाव्यात भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री यांच्या बाबत अपशब्द काढले होते. यनिषेधार्थ शिंदेसेनेने रामचंदानी यांच्या वक्तव्याचा निषेध करून आयलानी यांचा प्रचार करण्यास नकार दिला. टाऊन हॉल मधील महायुतीच्या मेळाव्यावर शिंदेसेनेने बहिष्कार टाकल्यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. त्यापाठोपाठ शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनीही माफी मागून शिंदेसेनेचा रोष कमी केला. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांगडे यांनी दोन दिवसापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेऊन समजूत काढली. त्यानंतर बुधवारी टाऊन हॉल मध्ये महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन कुमार आयलानी यांच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली. बैठकीला गोपाळ लांडगे, कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाजप नेते नरेंद्र राजांनी, राजेश वधारिया, प्रकाश माखीजा, लाल पंजाबी, राम चार्ली, रिपाईचे नाना बागुल, पीआरपीचे प्रमोद टाले, साई पक्षाचे जीवन इदनानी यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थितीत होते.
महायुतीच्या नेत्यांची बैठक झाल्यावर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, वाद संपुष्टात आल्याचे शिंदेसेनेचे नेते गोपाळ लांडगे यांनी सांगितले. तसेच महायुतीचे उमेदवारी कुमार आयलानी यांचा प्रचार एकत्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. शहर विकासासाठी व हक्काचा माणूस म्हणून नागरिक आयलानी यांच्याकडे बघत असल्याचे लांडगे यावेळी म्हणाले. संपूर्ण पत्रकार परिषद मध्ये भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना बोलू नं दिल्याने, रामचंदानी सर्वसमक्ष नाराजी दाखवीत असल्याचे चित्र होते.