लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमासाठी सरकारकडून तेजस्विनीच्या चार बस मंजूर झाल्या असून लवकरच त्या ‘केडीएमटी’च्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बस खरेदीसाठी निविदा काढली होती. तिला प्रतिसाद मिळाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराशी झालेल्या करारावर परिवहन सभापती, सदस्य तसेच उपक्रमाचे व्यवस्थापक मिलिंद धाट यांच्या मंगळवारी स्वाक्षऱ्या झाल्या. येत्या १० ते १५ दिवसांत या बस कल्याण डोंबिवली शहरात महिलांच्या सेवेसाठी धावतील,अशी माहिती सभापती मनोज चौधरी यांनी दिली.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस योजना सुरू केली आहे. राज्यातील विविध महापालिकांना ठराविक बस महिला लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या आहेत. केडीएमटी उपक्रमासाठीही सरकारकडून चार बस मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी येणारा भांडवली खर्च म्हणून सरकारने उपक्रमाला एक कोटी २० लाख मंजूर केले आहेत. या बस खरेदीसाठी पाच ते सहावेळा निविदा काढल्या. परंतु, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चार वर्षांहून अधिक काळ तेजस्विनी बसची प्रतीक्षा कायम राहिली. दरम्यान, व्यवस्थापक धाट आणि सभापती चौधरी व सर्वपक्षीय सदस्य यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा निविदा काढण्याची प्रक्रिया पार पडली. त्याला मात्र मंजुरी मिळाल्याने संबंधित कंत्राटदाराशी करार झाला होता. त्यावर स्वाक्षऱ्या झाल्याने या बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
------------------------------------
सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते नऊ या गर्दीच्या वेळी या बस महिलांसाठी उपलब्ध होणार आहेत. कल्याण पूर्व-पश्चिम आणि डोंबिवली पूर्व-पश्चिमला प्रत्येकी एक अशा चार बस धावणार आहेत.
------------------------------------------------------
फोटो आहे