उल्हासनगर : अखेर.. महापालिकेतील वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आल्याचे प्रसिद्धपत्रक महापालिका जनसंपर्क कार्यालयाने काढले. भदाणे यांनी नोकरीवेळी बनावट कागदपत्रे दिल्याचे चौकशीत उघड झाल्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या जनसंपर्क अधिकारी पदी युवराज भदाणे यांची नियुक्त झाल्यानंतर, भदाणे विविध वादात सापडले. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल असून त्यांच्यावर यापूर्वी अनेकवेळा निलंबनाची कारवाई झाली होती. चौकशीत भदाणे यांच्यावर एकूण ८ दोषारोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३ दोषारोप न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर चौकशी अधिकारी यांनी भाष्य केले नाही. उर्वरीत ५ दोषारोप सिध्द होत असल्याचा अहवाल प्राप्त झाला. सदर अहवाल विचारात घेऊन माजी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना महाराष्ट्र नागरी सेवा व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नियमानुसार बुधवारी ५ जुलै २०२३ रोजीच्या आदेशान्वये बडतर्फ करण्याची शिक्षा महापालिका आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांनी बजाविली आहे.
महापालिका वादग्रस्त अधिकारी युवराज भदाणे यांच्यावरील दोषारोप प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली. त्यासाठी मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिव यांची चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली. चौकशी अधिकारी यांनी चौकशी अहवाल सादर केला असता, सदर चौकशीमध्ये युवराज भदाणे यांच्यावर एकूण ८ दोषारोप ठेवण्यात आले होते. ८ पैकी ३ दोषारोप न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर चौकशी अधिकारी यांनी भाष्य केले नाही. मात्र उर्वरीत ५ दोषारोप सिध्द होत असल्याचा अहवाल प्राप्त झाला, सदर अहवाल विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांनी बुधवारी वादग्रस्त अधिकारी युवराज भदाणे यांना महाराष्ट्र नागरी सेवा व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नियमानुसार बडतर्फ केले आहे. भदाणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, महासचिव रामेश्वर गवई यांनी करून याबाबत त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. अखेर चौकशी नंतर बडतर्फ करण्यात आले आहे.