पंकज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क|बदलापूर :बदलापूर या वाढत्या शहरातील नागरिकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वस्त शिक्षणाची सुविधा शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते; कारण बदलापुरात अनेक शाळा उभारण्यात आल्या असल्या तरी त्या केवळ नफा कमावणाऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे बदलापूरमध्ये सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात अजूनही शिक्षण उपलब्ध होत नाही.
ज्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला, तीच माफक शुल्कात शिक्षण देत होती. मात्र ही शैक्षणिक संस्था वगळता बदलापुरात ज्या शैक्षणिक संस्था उभारल्या गेल्या, त्यांचा हेतू केवळ नफा मिळवणे हाच होता. वाढत्या शहरात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी ज्या पद्धतीने पालिका प्रशासनाची होती, त्याच पद्धतीने शिक्षण संस्थांचीही होती. मात्र बदलापुरातील उच्चभ्रू नागरिकांसाठी कॉर्पोरेट शाळा उभारण्याचे काम शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांनी केले. मात्र सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी शैक्षणिक संस्था उभारण्यात बदलापूरकर कमी पडले.
गल्लोगल्ली नर्सरी, प्ले ग्रुप बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी खासगी नर्सरी शाळा आणि प्ले ग्रुप चालवले जातात. परवानगी नसतानाही मिळेल त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या शाळा भरवण्यात येत आहेत. त्यांची फीही ३० हजारांहून अधिक आहे.
फाइव्ह स्टार सुविधांच्या शाळाबदलापुरात गेल्या चार ते पाच वर्षांत अनेक शाळा नव्याने उभारण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा पुरवणाऱ्या शाळा उभारल्या असल्या तरी त्या शाळांची फी ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे बदलापुरातील एका उच्चभ्रू गटाला लक्ष्य करून शाळा उभारल्या गेल्या आहेत.