लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकारीपदाची जबाबदारी देविदास पवार यांनी स्वीकारली. पदभार स्वीकारल्यावर त्यांनी अंबरनाथ पालिकेच्या विकासासोबत पालिकेची आर्थिक घडी बिघडणार नाही, यावर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले. तसेच शासनाकडून जास्तीतजास्त निधी कसा मिळवता येईल, याकडे लक्ष असेल, असेही त्यांनी सांगितले.अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारीपद महिनाभरापासून रिक्त होते. या पदावर मुख्याधिकारी पवार यांची नेमणूक केली आहे. पवार यांनी ३ जुलै रोजी दुपारी १ वाजता अधिकृतपणे पालिकेचा पदभार स्वीकारला. यानंतर, पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि शिवसेना नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली. या वेळी शहरातील कामांवर चर्चा करत असताना अंबरनाथ पालिकेची आर्थिक घडी बिघडणार नाही, या अनुषंगाने काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरात जे महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत, ते पूर्ण करण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचेही ते म्हणाले. शासनाकडून रस्त्यांसाठी आणि विकास प्रकल्पांसाठी जास्तीतजास्त निधी मिळवणे, पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये कामाची शिस्त आणि जबाबदारी निश्चित करणे महत्त्वाचे असून त्या अनुषंगाने कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.
पालिकेची आर्थिक घडी विस्कटणार नाही
By admin | Published: July 04, 2017 6:50 AM