बदलापूर : ओळखीच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी आतापर्यंत एक कोटीपेक्षाही जास्त रक्कम आणि दागिन्यांचा अपहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पल्लवी दोंदे आणि महेंद्र दोंदे अशी या दोघांची नावे असून, ते बदलापूरच्या जान्हवी लॉन्ससमोरील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहत होते. आपल्या ओळखीतल्या अनेकांकडून त्यांनी कधी गरज असल्याच्या नावाखाली, तर कधी गुंतवणुकीच्या नावाखाली खोटी आमिषे दाखवत पैसे घेतले; तर काही जणांकडून लाखो रुपयांचे दागिनेही घेतले. मात्र त्यानंतर त्यांनी हे दागिने गहाण ठेवत पैसे लंपास केले. पैसे किंवा दागिन्यांबाबत विचारले असता, आधी खोटी आश्वासने दिली जायची. काहींना तर १०-१० लाखांचे चेक देऊन नंतर ते बाऊन्स झाले. त्यानंतरही समोरच्यांनी पैशासाठी तगादा लावलाच, तर त्याला सरळ ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी हे दोघे द्यायचे. दोघांनी अनेकांना १ कोटींपेक्षाही जास्त रकमेचा गंडा घालून मुंबईला पळून गेल्यावर याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली. यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी तपास करत या दोघांना मुंबईतून बेड्या ठोकल्या. याप्रकरणी या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
या दोघांनी फसवणूक करून लाटलेल्या पैशांचे नेमके काय केले? त्यांच्यासोबत या सगळ्यात आणखी कुणी सहभागी होता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नसून, बदलापूर पूर्व पोलीस या सगळ्याचा तपास करत आहेत.