ठाणे : रिक्षाच्या प्रवासात गहाळ झालेल्या पर्समधील सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज ठाणेनगर पोलिसांनी हाती आलेल्या रिक्षाच्या अर्धवट नंबरवरून १० दिवसांत शोधून काढला. मुद्देमाल सुरक्षित असलेली पर्स पोलिसांनी महिलेला परत केली. त्यामध्ये चार तोळे सोन्याचे लॉकेट, चेन व रोख ७,३४० रुपयांसह आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, एटीएम, रेशनकार्ड आदी कागदपत्रांचा समावेश असल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.चितळसर मानपाडा येथील आरती अवस्थी यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.एम. सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजद्वारे रिक्षा शोधण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला खरा, परंतु त्यातून पोलिसांच्या हाती अर्धवट नंबर मिळाला. पथकास मिळालेल्या माहितीनुसार ती रिक्षा गांधीनगर, पोखरण रोड नंबर २ या ठिकाणी उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, रिक्षाचालकाची माहिती काढून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे गहाळ झालेली पर्स मिळाली. ठाणेनगर पोलिसांनी ती पर्स महिलेला शुक्रवारी परत के ली. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बाबर आणि त्यांच्या पथकाने केली.>चितळसर-मानपाडा येथील रहिवासी आरती अवस्थी (४२) या ४ नोव्हेंबर रोजी हॅप्पी व्हॅली ते ठाणे जिल्हा परिषद असा रिक्षाने प्रवास करताना, त्यांची पर्स गहाळ झाली. गहाळ झालेल्या पर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यामुळे अवस्थी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत, यासंदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला.
रिक्षाच्या अर्धवट नंबरवरून लावला दागिन्यांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 1:06 AM