ठाणे / मुंब्रा : येथील मुंब्रा भागात ठाणे महापालिका परिवहनची (टीएमटी) बससेवा सुरू झाली आहे. मात्र, थांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात वारंवार ठामपा सर्वसाधारण सभेमध्ये विषय काढूनही प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवकांना बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्टÑवादी काँग्रेसने ‘कहाँ गया उसे ढुंढो’, असे बसथांबे शोधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी दुर्बीण घेऊन बसस्टॉप शोधण्याचा प्रयत्न केला.मुंब्रा-कौसा परिसरात राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यानंतर नियमितपणे टीएमटीची सेवा सुरू केली. मात्र, ती सुरू झाल्यानंतरही येथील बसथांबे गायब झालेले आहेत. जे होते तेही आता दिसेनासे झाले आहेत. त्या निषेधार्थ नगरसेवक शानू पठाण आणि शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन केले. कौसा पोलीस चौकीपासून या आंदोलनाला सुरु वात झाली. या वेळी त्यांनी कहाँ गया उसे ढुंढो, असे गाणे गायले. या आंदोलनात अनिता किणे, राजन किणे, सिराज डोंगरे, नदीरा सुर्मे, आशरीन राऊत, फरजाना शाकीर शेख, मेराज खान, जफर नोमानी, हसीना अजीज शेख, साजिया अन्सारी, रूपाली गोटे, मोरेश्वर किणे, सुलोचना पाटील, बाबाजी पाटील, सुनीता सातपुते, जमिला खान सहभागी झाले.मुंब्य्रातून सुमारे साडेआठ हजार लोक दररोज टीएमटीने प्रवास करतात. कौसा ते रेतीबंदरदरम्यान ३० थांबे होते. मात्र, आता बसथांबाच दिसत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होते. याबाबत, मुंब्य्रातील नगरसेवकांनी महासभेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी आणि प्रशासन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पठाण यांचा आरोप आहे.
कहाँ गया उसे ढुंढो : बसथांबे शोधण्यासाठी राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 6:35 AM