- प्रशांत माने डोंबिवली - प्रवास करताना रिक्षात विसरलेली बॅग रामनगर पोलिसांनी तक्रार दाखल होताच तासाभरात शोधून दिली. तीन मोबाईल, दोन सोन्याची मंगळसूत्र आणि रोकड असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग सापडताच दाम्पत्याचा जीव भांडयात पडला.
डोंबिवली पूर्वेकडील रूणवाल माय सिटी येथे राहणारे विकास नाईक यांनी शुक्रवारी दुपारी अडीच ते पावणेतीन दरम्यान पत्नी आणि दोन लहान मुलांसह रिक्षातून फडके रोडवरील मॉडर्न कॅफे ते टंडन रोड असा प्रवास केला. रिक्षातून उतरल्यावर काही वेळाने आपली बॅग रिक्षात विसरल्याचे नाईक दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यांनी थेट रामनगर पोलिस ठाणे गाठले. बॅग हरविल्याची तक्रार दाखल होताच वरीष्ठ पोलिस निरिक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप आणि पोलिस हवालदार दत्तात्रय कुरणे आणि देवीदास पोटे यांनी तपासाला सुरूवात केली. ज्या रिक्षामधून नाईक दाम्पत्याने प्रवास केला त्या रिक्षाचा आणि चालकाचा सीसीटिव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला आणि रिक्षाच्या सीटच्या पाठीमागील बाजूस ठेवलेली मौल्यवान वस्तू असलेली बॅग हस्तगत करीत नाईक दाम्पत्याच्या हवाली केली.
वाढदिवशी मोबाईल दिला होता गिफ्टविकास यांनी पत्नीला वाढदिवसानिमित्त गुरूवारी मोबाईल फोन गिफ्ट दिला होता. त्या मोबाईल फोनसह अन्य दोन मोबाईल, सोन्याची दोन मंगळसूत्र तसेच रोकड असा किमती मुद्देमाल हरवलेल्या बॅगेत होता. बॅग शोधून दिल्याबद्दल नाईक दाम्पत्याकडून रामनगर पोलिसांचे आभार मानण्यात आले.