ठाणे : महावितरणच्या येथील ठाणे नागरी मंडळ, ठाणे येथील कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांच्या गळ्यात ओळखपत्र किंवा शर्टाच्या खिशाला नेमप्लेट नसल्याच्या तक्रारीवरून त्यांना प्रत्येकी १०० रुपये दंड भरण्याच्या कारवाईला तोंड द्यावे लागल्याचे निदर्शनात आले आहे.
येथील जागरूक नागरिक उज्ज्वल जोशी कार्यालयीन कामकाजासाठी महावितरणच्या ठाणे येथील ठाणे नागरी मंडल कार्यालयात गेले. मात्र, यावेळी या कार्यालयाचे प्रशासन कार्यकारी अभियंता डी.व्ही. मेहेत्रे व उपकार्यकारी अभियंता ए.पी. खोडे यांनी ओळखपत्र धारण केले नव्हते, एवढेच नव्हे तर त्यांच्या नावाची प्लेटही शर्टाच्या खिशाला लावलेली नसल्याचे जोशी यांच्या निदर्शनात आले. यामुळे या अधिकाऱ्यांची जोशी यांनी नियमानुसार एमईआरसीकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. तिची दखल महावितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता ए.यू. बुलबुले यांनी घेऊन मेहेत्रे व खोडे यांना विचारणा केली. मात्र, तक्रारीस अनुसरून त्या दिवशी या अधिकाऱ्यांनी नावाची प्लेट किंवा ओळखपत्र धारण केले नसल्याचे त्यांच्या बोलण्यावरून उघड झाले. यामुळे बुलबुले यांनी दोघांवर प्रत्येकी १०० रुपये दंडाची कारवाई केली. तक्रारीस अनुसरून वसूल केलेल्या दंडाची रक्कम दंड तक्रारदार जोशी यांना द्यायची किंवा कसे, याविषयी मार्गदर्शन बुलबुले यांनी महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाकडे मागितले आहे. यानंतर, संबंधित दंडाची रक्कम जोशी यांना द्यायची किंवा शासनजमा करायची, याविषयी आदेशानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. कार्यालयप्रमुखांना झालेल्या दंडाची कारवाई लक्षात घेऊन नागरी मंडल कार्यालयात अन्य अधिकारी, कर्मचारीवर्गात तर्कवितर्क काढले जात आहेत. अशी कारवाई होऊ नये म्हणून अन्य अधिकारी-कर्मचारी सतर्कता बाळगली जाते.