कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, सूचना देऊनही मास्क न वापरणाऱ्यांवर केडीएमसीची सुरू असलेली कारवाई पाहता सप्टेंबर २०२० ते जून २०२१ या कालावधीत २४ हजार ८६६ नागरिकांकडून एक कोटी २४ लाख ३३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढलेला प्रभाव पाहता मार्च ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात कारवाई झाली असून, या कालावधीत दंडही सर्वाधिक वसूल झाला आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, सूचना देऊनही मास्क न वापरण्याची नागरिकांची मानसिकता कायम आहे. महापालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये तसेच मार्केट येथे मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. केडीएमसीच्या १० प्रभाग क्षेत्रांच्या हद्दीत महापालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांच्यातर्फे ही कारवाई सुरू आहे. येऊ घातलेली तिसरी लाट पाहता मास्कची कारवाई सुरूच राहणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना नियम घालून देताना अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने चालू ठेवण्यास वेळेची मर्यादा घालून देण्यात आली होती. ही मर्यादा ओलांडणाऱ्या १९६ दुकानांना मागील १० महिन्यांत सील ठोकण्याची कारवाई मनपाने केली आहे.
सोशल डिस्टन्सिंगही धाब्यावर
मास्क वापरण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना मनपाने केल्या आहेत; परंतु या नियमाचे पालन होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दहा महिन्यांत मंगल कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, मॉल, हॉटेल, याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर बसविल्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करताना संबंधितांकडून ११ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
--------------------
------------------------------------------------------