लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, हे बेकायदेशीर आणि धोकादायकही आहे. तरीही, मोबाइलचा वापर करणाऱ्या सात हजार ८५१ चालकांकडून १५ लाख ७० हजारांचा, तर विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ९५ हजार २३६ चालकांकडून चार कोटी ७६ लाख १८ हजारांचा दंड ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वसूल केला आहे.
वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेकडून अनेक उपाययोजना तसेच जनजागृती केली जाते. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या विभागांतील १८ युनिटमार्फत पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या अधिपत्याखालील विविध पथकांकडून कारवाई केली जाते.
* हेल्मेट न वापरल्यामुळे ५० टक्के अपघातांत मृत्यू
रस्त्यावरील दुचाकींच्या अपघातांत ५० टक्के मृत्यू हे विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांचे तसेच कार चालविताना बेल्ट न लावणाऱ्यांचे झाल्याचे आढळले आहे. अशा अपघातांत हेल्मेट नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूची शक्यता ही ८० टक्के असल्याचे निरीक्षण ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी नोंदविले आहे.
* ब्रेथ अॅनालायझरनेही होते तपासणी
सध्या ठाणे जिल्ह्याचा कोरोना निर्बंधांमध्ये पातळी क्रमांक तीनमध्ये समावेश आहे. त्यामुळे ठाण्यात दुपारी ४ नंतर सर्व प्रकारच्या बारसह दुकानांनाही ठाण्यात बंदी आहे. त्यामुळेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या लक्षणीय घटली आहे. तरीही, ब्रेथ अॅनालायझरला प्लास्टिकचे नोझल लावून वाहनचालकांची तपासणी करून कारवाई करण्यात येते. सध्या १८ युनिटकडून ५४ ब्रेथ अॅनालायझरद्वारे ही तपासणी केली जाते.
* २०२१ मध्ये शहरात झालेले अपघात
अपघात जखमी मृत्यू
दुचाकी -३२८- ३२० -१०१
चारचाकी -३८- ३४ -६