ठाणे : एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्या ठिकाणी आगीचे बंब पोहचण्याचा कालावधी कमी व्हावा या उद्देशाने आता ठाणे अग्निशमन दलाने फायर अलर्ट हॉट लाईन सिक्युरीटी सिस्टीम कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.सध्या एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्याची माहिती दूरध्वनी, मोबाइल, व्यक्तीश: अग्निशमन केंद्रात येऊन, पोलीस नियंत्रण कक्षामार्फत, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षामार्फत अथवा इतर अग्निशमन दलामार्फत उपलब्ध होत आहे. परंतु, यामध्ये अधिक विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होणारा हा विलंब टाळण्यासाठी अग्निशमन विभागाने नागपूर महापालिकेच्या धर्तीवर फायर अलर्ट हॉट लाईन तंत्र विकसित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. काय आहे सिस्टीम...फायर अलर्ट हॉट लाईन सिस्टीम अंतर्गत संबधीत उपभोक्ता यांच्या जागेत स्मोक डिटेक्टर व फोन बसविण्यात येतो. प्रत्यक्ष ज्या परिक्षेत्रामध्ये आग लागते. त्यावेळी तेथे असलेला स्मोक डिटेक्टर असतो. तो अॅटीव्हेट झाल्यानंतर त्या ठिकाणी लागलेल्या आगीचा संदेश तेथे असलेल्या टेलीफोन इन्स्ट्रुमेंटमध्ये जातो. तेथून तो अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षास व त्याचबरोबर त्या जागेचे मालक, भोगवटादार यांच्या भ्रमणध्वनीवर तत्काळ जातो. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास संदेश आल्यानंतर लगेच नजीकच्या अग्निशमन केंद्रास त्या घटनास्थळी मदत पाठविण्याबाबत कळविण्यात येते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी संबधींत अग्निशमन केंद्राची मदत पाठविली जाईल, जेणेकरुन प्रतिसाद कालावधी कमी होणार आहे. प्रत्यक्ष जागेवर असलेल्या टेलीफोन इन्स्ट्रुमेंट मार्फत अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास या घटनेशी संबधीत असलेली सविस्तर माहिती मिळत असते. यामुळे अग्निशमन विभागाचा प्रतिसाद कालावधी नक्कीच कमी होणार आहे. संबधींत उपभोक्ता यांच्या जागेमध्ये बसविण्यात आलेल्या टेलीफोन इन्स्टुमेंटला एक अतिरिक्त कंट्रोल स्वीच बसविण्यात आले असून त्या ठिकाणी आगी व्यतिरिक्त इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास हा कंट्रोल स्वीच आॅपरेट केला असता घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळत असते. या प्रस्तावाच्या मंजुरीकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
अग्निशमन राबविणार फायर अलर्ट हॉटलाइन सिक्युरिटी सिस्टीम
By admin | Published: November 19, 2015 12:45 AM