जितेंद्र कालेकर
ठाणे: घोडबंदर रोड येथील वाघबीळ नाक्यावरील श्री साई प्युअर व्हेज हॉटेललाआग लागल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. या घटनेत हॉटेलच्या पोटमाळयावर अडकलेल्या दीपक दास (३०) याच्यासह तिघांची सुटका करण्यात ठाणे अग्निशमदन दल आणि आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले. हे तिघेही किरकोळ जखमी झाले असून आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
वाघबीळ येथे हरीश सालियन यांच्या मालकीचे तळ अधिक एक मजली इमारतीमध्ये हे श्री साई प्युअर व्हेज हॉटेल आहे. बुधवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास या हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती बाळकुम अग्निशमन दलाला मिळाली. त्याच आधारे घटनास्थळी कासारवडवली पोलिस कर्मचाºयांसह महावितरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अग्निशमन दलाचे जवान दोन फायर वाहन , दोन रेस्क्यू वाहन आणि एका जम्बो वॉटर टँकरसह दाखल झाले. या हॉटेलमधील स्वयंपाकगृहाची आग अचानक वरील मजल्यावर गेल्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. यावेळी हॉटेलमध्ये सहा कर्मचारी होते. त्यातील तिघांनी लगेचच हॉटेलबाहेर धाव घेतली. तर उर्वरित तिघे हे पोटमाळयावर झोपलेले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी यातील दीपक दास याच्यासह अमर देसाई (२८ ) आणि महेश मोकल (२९ ) अशा तिघांची सुटका केली. यात महेशच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून दीपकच्या हाताला आणि महेशच्या चेहºयाला किरकोळ दुखापत झाली आहे. या हॉटेलमधून सात व्यावसायिक भारत गॅस सिलेंडर आणि एक डोमेस्टिक भारत गॅस सिलेंडर बाहेर काढून अग्निशमन दलाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाºयांनी अर्ध्या तासाच्या अंतराने ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली. मात्र, या आगीमध्ये हॉटेलचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.