भिवंडी: राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मी कंपाउंड येथील शहा वेअर हाऊस व देशमुख वेअर हाऊस या ज्वलनशील केमिकल साठविलेल्या गोदामांना शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडीअग्निशमन दलाबरोबरच कल्याण डोंबिवली व ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र घटनास्थळी पाण्याचा अभाव असल्याने आग विझविण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या आगीत दहा ते बारा गोदाम जळून खाक झाले असून सायंकाळी सात नंतरही आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. पाण्याच्या अडचणीमुळे अग्निशमन दलाला अर्धा ते एक तास ताटकळत राहून पाण्याच्या टँकरची वाट पाहत राहण्याची वेळ आली होती.पाण्याच्या अभावामुळे आग विझवण्यात मोठी अडचण निर्माण झाली असून पाण्याच्या अभावी अर्धा ते एक तास पाण्याच्या वाट पाहत राहावी लागत आहे त्यामुळे अर्ध्या तासाने विझलेली आग पुन्हा भडकत आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी अग्निशमन दलाचे अधिकारी नितीन पष्टे यांनी दिली आहे.
राहनाळ, पूर्णा परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकल गोदामांचा साठा असून या ठिकाणी नेहमीच आग लागल्याच्या घटना घडत असतात, मात्र आगी विझवण्यासाठी सक्षम अग्निशमन यंत्रणा व पाण्याची नेहमीच वाणवा असल्याने भविष्यात पाण्यामुळे आगीची मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.