लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: खेवरा सर्कल येथील महावितरणच्या २२ केव्ही उच्च दाबाच्या वाहिनीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेनध्ये २० रहिवासी सुखरूप बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खेवरा सर्कल येथील व्हॅली टॉवर मधील महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिनीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यामुळे ही उच्च दावाची वाहिनी तुटून खाली पडली होती. त्याच दरम्यान, सोसायटीच्या आवारात १५ ते २० रहिवासी होते. सुदैवाने, ते या घटनेत बचावले. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापाकिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील वीज पुरवठा खंडित केला. त्यापाठोपाठ अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराने ही आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ट्रान्सफार्मर कधी हटविणार?
खेवरा सर्कल येथील व्हॅली टॉवर या सोसायटीच्या आवारात हे विद्युत ट्रान्सफार्मर आहे. अनेक वेळा या ठिकाणी शॉट सर्किटमुळे आगीच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारीही घटना घडली त्यावेळी १५ ते २० रहिवासी सोसायटीच्या आवारात होते. सुदैवाने, ते या घटनेत बचावले आहेत. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी हे ट्रान्सफार्मर सोसायटीच्या आवारातून काढण्याची मागणी महावितरणकडे यापूर्वीच केली आहे. अन्यथा, या वीज वाहिन्या भूमिगत टाकण्यात याव्यात, असे व्हॅली टॉवर सोसायटीचे सचिव नितीन चौधरी यांनी लोकमत ला सांगितले.