ठाणे: जुन्या बंद ठाणे महापालिका (आरोग्य केंद्र) रूग्णालयामध्ये असलेले जुने (रेकॉर्ड) कागदपत्रांना आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. ही घटना शीळ-कल्याण रोड घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून बऱ्या पैकी रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. काही तासात ही आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. मात्र या आगीचे कारण समजू शकलेले नाही अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
शीळफाटा, शीळ-कल्याण रोडवर ठाणे महापालिकेचे जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयाचे बांधकाम धोकादायक झाल्याने ते रुग्णालय बंद करून त्याच परिसरातील नव्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी ते रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले आहे. त्या बंद रुग्णालयात रेकॉर्ड आणि कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. त्याला सायंकाळी आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतल्यावर त्यांना यश आले. ही आग कोणी लावली की शॉर्टसर्किटने लागली. हे समजू शकले नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.