उल्हासनगर- कॅम्प नं-3 येथील पलूमल कंपाऊंड व जपानी मार्केटमधील दुकानाला शुक्रवारी रात्री आग लागून लाखोचे साहित्य व कपडे जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन २ तासांत आग आटोक्यात आणल्याची माहिती अग्निशमन विभागाचें प्रमुख बाळू नेटके यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ पलूमल कंपाऊंड येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने, नागरिकांची धावाधाव झाली. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन काही तासांत आग आटोक्यात आणली. मात्र आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिले.
दुसऱ्या घटनेत मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध जपानी मार्केटच्या दुकानाला आग लागल्याने, एकच खळबळ उडाली. आगीत तीन ते चार दुकानातील लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले. महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्यांसह अंबरनाथ, कल्याण शहरातील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझविण्यासाठी धाव घेऊन काही तासात आग आटोक्यात आणल्याची महिती आरोग्य अधिकारी बाळू नेटके यांनी दिली.
दोन्ही आगी शॉर्टसर्किट मुळे लागल्या असून अरुंद गल्लीतील आग विझविण्याची यंत्रणा महापालिकेकडे नसल्याचे उघड झाले. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नसून महापालिकेने अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्याची मागणी होत आहे.