अंबरनाथ : मोरीवली एमआयडीसी क्षेत्रात एका रासायनिक कंपनीला रात्री 12 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीत रसायनाचा मोठा साठा असल्याने परिसरातील गावांना देखील धोका निर्माण झाला होता. एमआयडीसी भागातील एका कंपनीला ही आग लागली असून सुरुवातीला या कंपनीतून वायुगळती सुरू झाली होती. वायू गळती होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला देताच अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले होते, मात्र अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचतात कंपनीतील रसायनाने पेट घेतल्याने कंपनीत भीषण आग लागली.
या आगीमुळे कंपनीतील ज्वलनशील रसायनांना मोठा धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत देखील अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल दीड तास अग्निशामक दलाचा प्रयत्न ही आग विझवण्यासाठी सुरू होता, मात्र आगी सोबत रसायन देखील पेट घेत असल्याने परिसरात अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. घातक असे केमिकल हवेत आल्याने नागरिकाने आपल्या घरातील दारे बंद करून घरात राहण्याचा निर्णय घेतला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशामक दल, एमआयडीसीचे अग्निशामक दल, आणि उल्हासनगरचे अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले होते.