ठाणे: बाळकुम,दुर्गा अंकुर इमारतीजवळ, अशोक नगर,दादलानी पार्क येथील भंगार मालाच्या गोडाऊनला आग लागली असून या आगीत पुठ्ठ्यांचे खोके जळाले आहेत. या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या आगीवर ४५ मिनिटांत नियंत्रण मिळविण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले आहे.
बाळकुम येथील प्रमोद मढवी यांचे भंगार मालाचे गोडाऊन आहे. त्यामध्ये पुठ्ठ्याचे खोके ठेवण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास तेथे आग लागल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली, तातडीने आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पुठ्ठयांचे खोके असल्याने सर्वत्र धुरच धूर पसरला होता. अखेर पाऊण तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच यावेळी,एक फायर वाहन, एक पाण्याचा टँकर तसेच जम्बो पाण्याचा टँकरला पाचारण केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.