कल्याण : पश्चिमेतील सिंडिकेट परिसरातील एका मिठाईच्या दुकानाला रविवारी मध्यरात्री आग लागली. मात्र, या आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर खड्ड्यांमुळे सुमारे ४५ मिनिटांनी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील वस्तूंचे नुकसान झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, अग्निशमन दलाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.सिंडिकेट परिसरातील स्टर्लिंग टॉवर इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका मिठाईच्या दुकानाला मध्यरात्री २.३० च्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली. मात्र, माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास ४५ मिनिटे लागल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यादरम्यान, आगीने रौद्ररूप धारण केल्याने झालेल्या धुराने इमारतीचा सातवा मजला गाठला. त्यामुळे, इमारतीमधील रहिवाशांच्या घरात धूर गेल्याने त्यांचा जीव गुदमरला. तसेच, काहींच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. तर, काहींच्या घरांच्या खिडक्याही तुटल्या. उशिरा आल्याबद्दल आम्ही अग्निशमन जवानांकडे विचारणा केली, असता त्यांनी खड्ड्यांमुळे येण्यास उशीर झाल्याचे सांगितले, असे इमारतीमधील रहिवासी एन.व्ही. राव आणि फ्रान्सिस जोस यांनी सांगितले. दरम्यान, या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला. आगीचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.अवघ्या १५ मिनिटांत जवान घटनास्थळी - गुंडआगीची वर्दी मिळाल्यानंतर १५ मिनिटांमध्ये अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, त्यांनी आग आटोक्यात आणल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी सांगितले.
कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे बंब पोहोचले उशिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:14 AM