विशाल हळदे / पंकज रोडेकर लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रविवारी सकाळच्या थंडीत ठामपाच्या बाळकुम अग्निशमन दलाचा फोन खणखणला... ‘साहेब, विजेच्या खांबावर एक कबुतर अडकले आहे.’ अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच कबुतराच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. साडेतीन तासांनंतर या मुक्या जीवाची सुटका झाल्याचा दावा अग्निशमन दलाने केला असून प्रत्यक्षदर्शींनी मात्र सुटकेसाठी उशीर झाल्याने कबुतराचा जीव गेल्याचे सांगितले आहे.पोखरण रोडवरील सुभाषनगर येथील रस्त्यालगत असलेल्या एका विजेच्या खांबाच्या टोकाला कबुतर अडकले होते. सुटकेसाठी ते जीवाचा आटापिटा करत असल्याचे एका दक्ष नागरिकाने पाहिले. त्याने अग्निशमन दलाला ही माहिती दिली. त्यानुसार, बाळकुम अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेतली. त्या वेळी कबुतराचे दोन्ही पाय मांज्यामध्ये अडकल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला चाकू बांधलेल्या लांब काठीच्या साहाय्याने कबुतराला सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यामध्ये यश आले नाही. कबुतराची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाच्या मोठ्या गाडीचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, बाळकुम अग्निशमन दलाकडे ही गाडी उपलब्ध नसल्याने त्यांनी ८ च्या सुमारास वागळे इस्टेट अग्निशमन दलाशी संपर्क साधून त्यांची मदत मागितली. मात्र, वागळे इस्टेट अग्निशमन दलाची मोठी गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत जवळपास ९.१५ वाजले होते. या मोठ्या गाडीने जवानांचे काम सहज झाले. कबुतराची सुटका केल्यानंतर त्याने लगेच आकाशात भरारी घेतल्याचा दावा बाळकुम अग्रिशमन दलाचे उपस्थानक अधिकारी डी.एम. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घटना समजल्यानंतर अग्निशमनने तातडीने धाव घेतली; पण त्यांच्या प्रयत्नांना उशीर झाला. कबुतराची सुटका झाली तेव्हा ते निपचित होते.
अग्निशमन दल म्हणते, कबुतर उडाले भुऽऽर्र!प्रत्यक्षदर्शी म्हणतात, उशीर झाल्याने गेला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:19 AM