ठाणे : मुंब्र्यातील प्राईम क्रिटिकेअर या रुग्णालयाला पहाटे 3.40 च्या सुमारास आग लागली. या आगीनंतर आयसीयु मध्ये दाखल असलेल्या 6 रुग्णांना तसेच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर आयसीयु मधील चार रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र या चार जणांचा मृत्यू आगीत होरपळून झाला नसून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे .
आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी ठाणे अग्निशमन दलाचे तीन बंब तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम दाखल झाल्यानंतर काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवता आले.रुग्णालयातील इतर रुग्णांना जवळच्या बिलाल रुग्णालयात हलविण्यात आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला .दरम्यान ही आग मीटर बॉक्स मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.रुग्णालयात एकूण 20 रुग्ण दाखल होते.तर सहा रुग्ण हे आयसीयु मध्ये दाखल होते.आग लागल्यानंतर सर्व रुग्णांना वेळेत दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे आगीत कोणीही होरपळून मेले नाही . मात्र त्यानंतर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सदरचे रुग्णालय हे कोविड रुग्णालय नव्हते .
फायर ऑडिटची नोटीस देऊनही दुर्लक्ष...या रुग्णालयाला यापूर्वी देखील ठाणे अग्निशमन विभागाच्या वतीने फायर ऑडिटची नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही याकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे .
मृतांची नावेःयास्मिन सय्यद,हालिमा बी सलमानी,हरिष सोनावणे,नवाब शेख.
सदर आगीच्या घटनेत मृ्त्यूमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींना देखील १ लाख देण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.