मीरा रोड : गुजरातहून ठाण्याच्या दिशेने जाणाºया लक्झरी बसने शुक्रवारी सकाळी ७ वा.च्या सुमारास घोडबंदर मार्गावरील टोलनाक्याजवळ अचानक पेट घेतला. बसमधील २२ प्रवासी व बसचालक आधीच बाहेर पडल्याने बचावले. यात बसबरोबरच प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाले.
गुजरातहून २२ प्रवाशांना घेऊन जात असलेली लक्झरी बस वरसावे नाक्यावरून उजवीकडे घोडबंदर मार्गावर जात होती. तोच बसचा मागचा टायर फुटल्याने चाक, तसेच बस घासत काही अंतरावर गेल्याने ठिणग्या उडत बसच्या मागील भागात आग लागली. चालकाने टोलनाक्याआधीच बस बाजूला थांबवली.
साखरझोपेत असलेले प्रवासीही जीवाच्या भीतीने घाबरून बाहेर पडले. बसमधील सामानही काढायला वेळ मिळाला नाही. आग लागल्याचे कळताच मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. पुढील भाग जळण्यापासून वाचला असला, तरी यात बहुतांश बस जळून खाक झाली. या घटनेने एकच घबराट उडाली. वाहतूक पोलीस व काशिमीरा पोलीस घटनास्थळी धावून आले. काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती.
बाटल्यांबाबत संभ्रमबसचे मागचे टायर फुटून त्याच्या घर्षणाने आग लागल्याचे सांगितले जात असले, तरी बसच्या मागील डिकीत असलेल्या सामानात काही ज्वलनशील द्रव्य असल्याने आग भडकली, असे सूत्रांनी सांगितले. याला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी दुजोरा दिला असून त्या बाटल्या कसल्या होत्या, हे समजू शकलेले नाही. चालकानेही पार्सल सामानात काय असते, याची कल्पना नसल्याचे सांगितले, असे पवार म्हणाले.