मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयासह पालिका शाळा व नगरभवनमधील अग्निरोधक यंत्रांची मुदत गेल्या वर्षी संपूनही पालिकेने त्याकडे डोळेझाक चालवल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. विद्यार्थ्यांसह नागरिक व पालिका कर्मचाऱ्यांची सुरक्षाच रामभरोसे आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेकडून सामान्य नागरिकांच्या गृहनिर्माण संस्थांसह शाळा, विविध आस्थापनांना अग्निशामक यंत्रणा बसवण्याचे उपदेश देत असते. अग्निशामक यंत्रणा बसवणे बंधनकारक असताना त्याची काटेकोर अंमलबजावणीच केली जात नाही. त्यातच, आता महापालिका मुख्यालयासह पालिकेच्या ३६ शाळा, नगरभवन येथील कार्यालये व सभागृह आदी ठिकाणी लावलेल्या अग्निरोधक यंत्रांची मुदत गेल्यावर्षीच संपली आहे. मुख्यालयासह नगरभवनमध्ये पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांची दालने आहेत.
सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधीही मोठ्या संख्येने येत असतात. तर पालिका शाळांमध्ये पहिली ते आठवीचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारीवर्ग असतो. मुख्यालय व नगरभवनमध्ये अग्निरोधक यंत्रांसह अग्निशमन यंत्रणा आहे. पण, शाळांमध्ये केवळ अग्निरोधक यंत्रांवरच सुरक्षेची भिस्त आहे.
अग्निरोधक यंत्रांची मुदत गेल्या वर्षीच संपल्याने आग लागल्यास ती कूचकामी ठरणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत आग शमवण्यासाठी यंत्रच नसल्याने अनर्थ होण्याची भीती आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षी मुदत संपलेली असतानाही पालिका प्रशासनाने आजतागायत त्याकडे डोळेझाक केली आहे.तातडीने मुदत संपलेल्या अग्निरोधक यंत्रांना बदलून त्यांचे रिफिलिंग करून पुन्हा लावले जातील. - डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त
महापालिका, शाळा व नगरभवनमधील अग्निरोधक यंत्रांची मुदत संपली असून आम्ही त्वरित ते बदलण्यास घेतले आहे. - प्रकाश बोराडे, अग्निशमन दल अधिकारी, प्रभारी
गेल्या वर्षी अग्निरोधक यंत्रांची मुदत संपूनही पालिकेने अजूनही ते रिफिलिंग न करणे गंभीर बाब आहे. पालिकाच नियमांचे पालन करत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यांना नागरिकांच्या सुरक्षिततेचे काही पडलेले नाही. - डॉ. जितेंद्र जोशी, नागरिक