नितिन पंडीत
भिवंडी ( दि. १६ ) भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून कशेळी येथे फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या आगीत फर्निचरचे गोदाम व कारखाने जळून खाक झाले आहेत. ही आग लाकडी फर्निचर असल्याने काही क्षणातच गोदाम , कारखाना ,लगतच्या दुकानांध्ये पसरली. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीत लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिवंडी , ठाणे , कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्याने शनिवारी पहाटे ही आग आटोक्यात आली आहे.
विशेष म्हणजे या आगीचे नेमकी कारण समजले नसले तरी शॉर्ट सर्किटने ही आग लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर शुक्रवारी दसरा निमित्त कामगारांना सुट्टी असल्याने जिवीत हानी टळली आहे. मात्र या आगीत लाखोंचा नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भिवंडी - ठाणे मार्गावर असलेल्या कशेळी टोल नाक्या नजीकच महालक्ष्मी फर्निचर नावाचे मोठे शोरूम आणि कारखाना आहे. या फॅमिचर कारखान्यात रात्रीच्या सुमारास अचानक या ठिकाणी आग लागली . तर आग एवढी भीषण आहे की, या आगीचे लोट सर्वत्र पसरले होते. घटनास्थळी अग्निशमन दल व स्थानिक नारपोली पोलिसांचे पथक दाखल असून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. विशेष म्हणजे काही लगतचे दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली होती त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी शनिवारी सकाळी या आगीवर पूर्णनियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या यश आले आहे.
महत्वाचे म्हणजे भिवंडीत गोदामांमध्ये आगी लागण्याचे सत्र नेहमीच घडत असते मात्र या आगिंचे कारण नेहमीच गुलदस्त्यात असते, वारंवार लागणाऱ्या या आगी नेमकी कशामुळे लागतात याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा नेहमीच अपयशी ठरतांना दिसत आहे. विशेष म्हणजे नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने नारपोली पोलीसठाण्याकडून आजपर्यंत एकही गोदामांच्या आगीच्या खऱ्या कारणांची माहिती पोलोसांनी आजपर्यंत दिलेली नाही. त्यातच दिवाळी सण, डिसेंबर व मार्च महिन्याच्या शेवटी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगी लगण्याचे सत्र वारंवार घडतात त्यामुळे या आगी इन्शुरन्स मिळविण्यासाठी लावण्यात येत असाव्यात असा संशय वारंवार व्यक्त करण्यात येतो मात्र संशय व्यक्त केल्या नंतरही या आगिंचे खरे कारण आजपर्यंत समोर आलेले नाही.