भिवंडी: भिवंडी शहर व ग्रामीण भागातील गाेदामपट्ट्यात आगीचे सत्र सुरू आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा लाखोंचे भंगार साठवून ठेवलेल्या भंगार गाेदामांना अचानक भीषण आग लागून १७ गाेदामे जळून खाक झाली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शहरातील गायत्रीनगर परिसरातील फातमानगर भागात भंगाराची गाेदामे आहेत. त्यांना पहाटे ५ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांसह पाण्याच्या टँकरने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, तोपर्यंत आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल १७ भंगार गुदामे पडल्याने ती जळून खाक झाली. यामुळे आर्थिक नुकसान झाले.
कापडाच्या चिंध्यांमुळे भडकली आगगाेदामांत कापडाच्या चिंध्या, लोचन, प्लॅस्टिक, पुठ्ठे मोठ्या प्रमाणावर साठविल्याने आग अधिकच भडकून लगतच्या इतरही गाेदामांना त्याची झळ बसली. आगीचे कारण अजून अस्पष्ट असून, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या ठिकाणी सध्या कूलिंगचे काम सुरू असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.