भिवंडी - भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्टांमध्ये आगी लागण्याचे सत्र सुरूच असून गुरुवारी सकाळी एका रेगझिन व लेदर बॅग बनविणाऱ्या कारखान्यास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे .ही घटना भिवंडी तालुक्यातील ओवळी गावातील सागर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील मॅट्रिक्स इंडिकेटेट प्रॉडक्ट एलएलपी कंपनीचा रेगझनी व लेदर बॅग तयार करणार कारखाना येथे घडली आहे.
आगीची वार्ता समजताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत पहिल्या मजल्यावरील कारखान्याचे चार गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले असताना, या ठिकाणी आग विझविण्याची यंत्रणा पोहचत नसल्याने गोदमाची मागील बाजूची भिंत फोडून आग विझविण्याचे प्रयत्न केले.आगीची व्याप्ती पाहता भिवंडी पाठोपाठ ठाणे व कल्याण येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले.आगीचे कारण अजून अस्पष्ट असून सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान या भीषण आगीत लाखो रुपयांचा कच्चा माल व यंत्रसामुग्री जळून खाक झाली आहे .तर आग नियंत्रणात आणण्यासाठी सहा तास अग्निशामक दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.