नितिन पंडीत
भिवंडी - गोदाम व यंत्रमाग मोठ्या प्रमाणात असलेल्या भिवंडीतआग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका गोदाम कारखान्यास भीषण आग लागल्याची घटना खोणी ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या मिठपाडा येथील साईनाथ कंपाउंड येथे घडली आहे. या ठिकाणी एका बंद कारखान्यात केमिकलचा अवैध साठा करून ठेवण्यात आला होता. या आगीत केमिकलच्या ड्रमचा मोठ्या प्रमाणात स्फोट होत असल्याने येथील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे दाटी वाटीच्या ठिकाणी असलेल्या या कारखान्यात केमिकलच्या ड्रमला लावलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकल मिश्रित धूर पसरल्याने येथील नागरिकांना डोळे चुरचुरने व घशाला खवखवण्यासारखे त्रास होत असून नागरिकांना श्वास घेण्यास देखील अडचण होत आहे. विशेष म्हणजे हा कारखाना नेमकी कुणाचा असून या कारखान्यात हे केमिकलचे ड्रम नेमकी कोणी ठेवले आहेत.
याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळत नसून आगीचे नेमकी कारण देखील समजले नाही. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी मनपाच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून पाणी व फोमच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या आगीमुळे जिवीत हानी झाली नसली तरी केमिकलच्या ड्रमचा मोठमोठ्याने स्फोट होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.