मीरा रोड : भाईंदर पूर्वेला सुजाता शॉपिंग सेंटरमागील अमर औद्योगिक वसाहतीतील गाळ्याला रविवारी रात्री आग लागली. आतील पॅकिंगचे खोके, प्लास्टिक साहित्याने आदीने पेट घेतल्याने आग भडकली. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे अडीच वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
अमर इस्टेटमधील गाळा क्र. १६ हा दोन मजल्यांचा असून धानुका फिटिंग आणि शशी एंटरप्रायझेस या दोन कंपन्या येथे चालतात. येथे हार्डवेअरचे साहित्यही बनवले जाते. रविवारी रात्री १० वाजता या गाळ्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, दुसऱ्या मजल्यांपर्यंत ती पसरली. आग आणि धुराचे लोट उसळल्याने आजूबाजूला घबराट माजली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नवघर, भार्इंदर व मीरा रोड अग्निशमन केंद्रांतील पाच मोठे व दोन लहान अग्निशमन बंब, पाण्याचे टँकर आणि ४५ अधिकारी-जवान घटनास्थळी दाखल झाले होते. ही आग आजूबाजूच्या गाळ्यांमध्येही पसरली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतरही वीजपुरवठा सुरू असल्याने पाण्याचा मारा करण्यात अडचण येत होती. काहीवेळाने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या गाळ्यांमध्ये आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बेकायदा वाढीव बांधकामे झाली असल्याने अरुंद गल्ली तसेच गाळ्यातील जिनेही अरुंद असल्याने आग विझवण्यात मोठी अडचण आली. यानिमित्ताने औद्योगिक वसाहतीतील बेकायदा बांधकामांना दिल्या जाणाºया संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बेकायदा गाळ्यांना पालिकेचे अभय?
गेल्याच आठवड्यात मीरा रोडच्या प्लेझंट पार्क-एमआयडीसी मार्गावरील पालिका आरक्षणातील मोकळ्या भूखंडात उभारलेल्या बेकायदा ताडपत्री-बांबूंच्या गोदामांना भीषण आग लागली होती. वाढीव बेकायदा गाळ्यांना आग लागल्याच्या या घटनेने शहरातील बेकायदा बांधकामे-मंडपशेड धोकादायक बनल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींकडूनच त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप होत आहे.