कल्याण- रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राच्या मागच्या बाजूला कचऱ्याला आग लागली. या ठिकाणी असलेला रस्ता अतिशय अरुंद असल्यानं तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आरपीएफ व रेल्वे कर्मचाऱ्यांनी झाड्यांच्या फांद्यांच्या मदतीनं आणि बादली बादलीनं पाणी आणून आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यामुळे रेल्वे जंक्शन असूनही कल्याण रेल्वे स्थानकातील आग विझवण्याची यंत्रणा कुचकामी असल्याची बाब आज पुन्हा एकदा उघडकीस आली.कल्याण रेल्वे स्थानकाचा परिसर 65 एकर इतका मोठा आहे. कल्याण हे जंक्शन स्थानक असल्यानं या ठिकाणाहून लाखो प्रवासी प्रवास करतात. या ठिकाणाहून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या आणि उपनगरीय गाड्यांची संख्या मोठी आहे. स्थानकात एकूण आठ प्लॅटफॉर्म आहेत. फलाट क्रमांक एक जवळ रेल्वेचं तिकीट आरक्षण केंद्र आहे. या केंद्राच्या मागे रेल्वे परिसरातील कचरा टाकला जातो. या कचऱ्याला आज दुपारी अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात येणार होतं. मात्र त्याठिकाणी पोहोचण्याचा रस्ता अरुंद असल्यानं आणि परिसरात केबल वायर असल्यानं अडथळा निर्माण होतो.अग्नीशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच आरपीएफ जवान व कामगारांनी कचऱ्याला लागलेली आग विझवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पाण्याच्या बादल्या घेऊन आगीवर पाणी टाकले. तसेच झाड्यांच्या फांद्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे फलाट क्रमांक एकसह अन्य परिसरात धूरच धूर झाला होता. हा धूर प्रवाशांच्या नाकातोंडात गेल्यानं प्रवाशांचा श्वास कोंडला. आगीमुळे मुंबईहून कल्याणला येणारी गाडी पत्री पुलाजवळ एक तास उभी करुन ठेवली होती. रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राच्या मागे टाकण्यात येणारा कचरा उचलण्यासाठी महापालिकेचे कामगार अथवा कचरा गाडी येत नाही. त्यामुळे त्याठिकाणी कचरा साचला आहे. काही महिन्यापूर्वी दुरुंतो एक्सप्रेसच्या डब्याला कल्याण स्थानकात आग लागली होती. वर्षभरापूर्वी राजेंद्रनगर एक्सप्रेसच्या इंजिनालाही आग लागली होती. त्यावेळीही स्थानकात आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानाला कसरत करावी लागली होती.
कल्याण रेल्वे स्थानकाची सुरक्षा रामभरोसे; बादलीनं पाणी घेऊन आग विझवण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 5:12 PM