लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : खडी खदाण येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान गेल्या २० तासांपासून प्रयत्न करीत आहेत. आगीने कॅम्प नं ५ परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.खडी खदाण येथील डम्पिंग ग्राउंडवर उंचच उंच कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून महापालिका पर्यायी डम्पिंग जागेच्या शोधात आहेत. दरम्यान बुधवारी सायंकाळी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला आग लागल्याने परिसरात आगीने धुराचे साम्राज्य निर्माण झाले. महापालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवक व शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी डम्पिंग ग्राउंडकडे धाव घेऊन आगीचा आढावा घेतला. अग्निशमन दलाचे जवान गेल्या २० तासांपासून डम्पिंगला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आग आटोक्यात केव्हा येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेने गेल्या महिन्यात डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे सपाटीकरण करण्याचा ठेका खासगी कंपनीला देऊन जेसीबीसह अन्य मशीन घेण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यावर ७५ लाखांचा जास्तीचा खर्च महापालिका करणार आहे. एकीकडे शहरातील कचरा उचलणे, डम्पिंगवरील कचऱ्याचे सपाटीकरण करणे, शहरातील डेब्रिज उचलणे आदींवर कोट्यवधींचा खर्च करूनही कचऱ्याचा प्रश्न जैसे थे आहे. महाशिवरात्रीमध्ये कचऱ्याचे ढीग साचू नये म्हणून डम्पिंगला आग लागलेली असतानाही कचरा उचलण्याचे काम कोणार्क कंपनीने सुरू ठेवले आहे. एकूणच कचऱ्याच्या नावाने काहीजण स्वतःचे चांगभले करून घेत असल्याची टीका सर्वत्र होत आहे. पालिकेच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डम्पिंगवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोधखडी खदान येथे कचरा टाकण्यास पहिल्या दिवसांपासून स्थानिक नागरिक व नगरसेवक विरोध करीत आहेत. येथील डम्पिंग हटविण्यासाठी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, उपोषण, महासभेत आंदोलन करून विरोध दर्शविला. डम्पिंगवरील कचऱ्याच्या आगीने विरोध तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.