कल्याण : कल्याणमधील आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याच्या उपाययोजना २०१० सालापासून सुरू आहेत. मात्र, ते अद्याप पूर्णपणे बंद झालेले नाही. त्यावरील कचऱ्याचा डोंगर कमी झाल्याचा दावा महापालिका प्रशासाकडून केला जात असला तरी डंपिंगला वेळोवेळी लागणाऱ्या आगींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा मुद्दा बासनात गुंडाळल्याचे उघड झाले आहे.
आधारवाडी डंपिंग ग्राऊंड हा कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी कळीचा मुद्दा आहे. तत्कालीन आयुक्त पी. वेलारासू यांच्या कारकिर्दीत डंपिंगला अशीच भरउन्हाळ्य़ात आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, तिच्यावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला चार ते पाच दिवस लागले होते. डंपिंगला आग लागण्याच्या घटना वारंवार होतात. त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी वेलारासू यांनी प्रयत्न केले होते. याच वादातून वेलारासू यांची बदली झाली होती. त्यावेळी वेलारासू यांनी प्रशासनाला सुचविले होते की, डंपिंगजवळ कल्याण खाडी आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पाण्याचे पाईप सोडून खाडीतील पाणी या पाईपद्वारे डंपिंगवर सोडले जावे. आग लागल्यास या पाईपद्वारे खाडीच्या पाण्याने आग विझविली जाईल. हा उपाय करण्यासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांनी प्राकलन तयार केले. त्यासाठी अंदाजे खर्च ७५ लाख रुपये होता. मात्र, डंपिंग कायमस्वरुपी बंद करण्यात येणार असल्याने इतका मोठा खर्च वाया जाऊ शकतो, या कारणास्तव हा प्रस्ताव पूर्णत्वास येऊ शकला नाही. आता पुन्हा डंपिंगला आग लागली. सध्या उन्हाळा अन्य वर्षांपेक्षा जास्त कडक आहे. तीव्र सूर्यकिरणांचा मारा कचऱ्यावर झाला की, ढिगाऱ्याखाली मिथेन वायू तयार होऊन डंपिंगला आग लागते, असा एक अंदाज आहे. मात्र, अनेकदा या आगी लावल्या जातात असा आरोप केला जातो. एकदा तर अशीच आग लावणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आगी कोण व कशासाठी लावतो. त्यातून साध्य काय होते, हा अनाकलनीय प्रश्न आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी आग कशामुळे लागली याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मंगळवारी रात्री आग लागल्याचे कळताच यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे मध्यरात्री एक वाजेपर्यंत जातीने उपस्थित होते.
....
खाडीच्या बाजूने लागली आग
डंपिंगवरील कचऱ्याला खाडीच्या बाजूने आग लागली. त्या बाजूने जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे आगीने भीषण स्वरूप धारण केले. बुधवारपासून महापालिकेने त्या ठिकाणी पोहोचण्याकरिता तात्पुरता रस्ता तयार केला आहे. यापूर्वीही दरवर्षी महापालिकेकडून कचऱ्याच्या गाड्या डंपिंगवर जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार केला जातो. डंपिंग ग्राऊंड बंद केले जाणार असल्याने तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात आहेत.
--------------------