ठाणे: शहरातील आंबेडकर रोडवरील दोन दुकानांना लागलेल्या आगीत तेथील फळाच्या दुकानामधील पिंजऱ्यातील एका पोपटाचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. तसेच यामध्ये इंटरनेट आणि फळांच्या दुकानाचे नुकसान झाले असून त्या दुकानांच्या बाजूला असलेल्या भंगारातील दोन वाहनांनीहीे पेट घेतला. तसेच ही आग शॉटसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने वर्तविला आहे.
ठाण्यातील आंबेडकर रोडवरील प्रतीक्षा टॉवर परिसरात दोन दुकानांना गुरुवारी सायंकाळी अचानक आग लागली. याचवेळी दुकानाशेजारी भंगारातील एका दुचाकी आणि एका टेम्पोने ही पेट घेतला. या आगीचा धूर लांबून दिसत होता. तसेच आगीने काही क्षणात भीषण रूप धारण केल्याने आगीत दुकानाचे नुकसान झाले आहे. तसेच या आगीत फळांच्या दुकानातील पोपटचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष, राबोडी पोलीस आणि महावितरण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतल्यावर काही तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी २ फायर इंजिन, १ रेस्क्यू वाहन आणि २ पाण्याचे टँकर पाचारण केले होते.