उल्हासनगर : खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंडला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास, आग लागल्याने, परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. महापालिका अग्निशमन दलाच्या ३ गाड्यांच्या सहाय्याने आग विझविण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी (fire brigade) बाळू नेटके यांनी दिली आहे. (Fire at Ulhasnagar dumping site, fire brigade on the spot)
उल्हासनगर महापालिका कॅम्प नं-५ खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंडवर शहरातील कचरा टाकण्यात येते. बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डम्पिंगला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका अग्निशमन दलाच्या ३ गाड्या आग विझवित आहेत. यापूर्वीही उन्हाळ्यात आगी लागल्याच्या घटना घडल्या आहे. या आगीमुळे परिसरात पसरलेल्या धुराने २० हजारा पेक्षा जास्त नागरिकांना त्रास होत असल्याचे स्थानिक नगरसेवक सतरामदास जेसवानी यांनी म्हटले आहे. पावसाळ्यात डम्पिंगच्या दुर्गंधीने तर उन्हाळ्यात आगीच्या धुराने स्थानिक नागरिक हैराण झाले. डम्पिंग ग्राऊंड हटविण्याची मागणी कायम असल्याचे जेसवानी यांचे म्हणणे आहे.
मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांनीही डम्पिंग ग्राऊंडवर धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग लागल्याने, स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीवर लवकरच नियंत्रण मिळविण्यात येईल, असे अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी सांगितले. डम्पिंगवरील आगीमुळे कचरा टाकण्याचे काम तात्पुरते थांबविण्यात आले असून कचरा उचलला नाही तर, ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती सभागृह नेते भारत गंगोत्री यांनी व्यक्त केली.
दरम्यान महापालिकेने म्हारळगाव शेजारील बंद केलेल्या, राणा खदान डम्पिंग ग्राऊंडच्या पायथ्याशी कचऱ्याचे ढिग बाजूला करून अवैध चाळींचे बांधकाम सुरू झाले. अशा अवैध चाळीवर महापालिकेने वेळीच पाडकाम कारवाई केली नाही तर, आग व पावसाळ्यात कचऱ्याचा ढिगारा पडून जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.