ठाणे : मुंबईतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या मागील भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर ठाणे महापालिका हद्दीतील ३८४ छोटीमोठी खाजगी रुग्णालये पुन्हा अग्निसुरक्षेच्या रडारवर आली होती. महापालिकेच्या मुख्य अग्निशमन विभागामार्फत त्यांच्या तपासणीचे निर्देश देऊन त्याचा अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार, आतापर्यंत १८१ रुग्णालयांनी आपले अहवाल सादर केले असून त्यांची अग्निसुरक्षा योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, उर्वरित २०३ रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या रुग्णालयांनी अद्याप आपले अहवाल सादर केलेले नाहीत.
२५ ते ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेली रुग्णालये अग्निशमन विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, वापरात बदल अशा विविध कागदपत्रांच्या कात्रीत अडकली असून त्यांची त्यातून मुक्तता करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.आरोग्य सेवा संचालनालयाने हॉस्पिटलची नोंदणी किंवा पुनर्नोंदणी करताना अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सक्तीचे केले असले, तरी नर्सिंग होम अॅक्टमध्ये अशी एनओसी किंवा वापरबदलाबाबतचा उल्लेख नाही. कायद्यातील याच मुद्यावर बोट ठेवून महापालिकेने शासनाच्या परिपत्रकाला यापूर्वीच केराची टोपली दाखवली आहे. त्यानुसार, एप्रिल २०१८ पासून ठाण्यातील रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ३८४ खाजगी रुग्णालयांची नोंदणी पूर्ण झाली आहे.आता पालिकेच्या कारवाईकडे लक्षमुंबईत कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ठाणे अग्निशमन दलाने शहरातील सर्वच रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणीसाठी केंद्रात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, या कालावधीत आतापर्यंत ३८४ पैकी केवळ १८१ रुग्णालयांनी आपले अहवाल सादर केल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.हा अहवाल सादर केल्यानंतर अग्निशमन दलाने या रुग्णालयांची पाहणी करून त्याठिकाणी योग्य अशी सुरक्षा यंत्रणा आहे किंवा नाही, याची पडताळणी केली. ज्या ठिकाणी काही बदल करण्याची गरज होती, तिथे बदल करण्याच्या सूचना देऊन त्यांना नंतर ना-हरकत प्रमाणपत्र दिले. परंतु, हा नियम सर्वच रु ग्णालयांना लागू पडत असल्याने इतर रुग्णालयांनीही अशा प्रकारे अर्ज सादर करून पडताळणी करून घेण्याची गरज होती.मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या203रुग्णालयांबाबतीत महापालिका काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.यासंदर्भात अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत काळे यांच्याशी संपर्क साधला असता, जेवढ्यांनी अर्ज सादर केले होते, त्यांची तपासणी केली आहे. परंतु, शिल्लक राहिलेल्या रुग्णालयांच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभाग घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.