उल्हासनगर : कॅम्प नं-३ नेहरू चौकातील युनिव्हर्सल ट्रेडर्स या फटाक्याच्या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून ४३ लाख २७ हजाराचा विनापरवाना फटाक्यांचा साठा जप्त केला. या कारवाईने फटाक्यांची दुकाने पोलिसांच्या टार्गेटवर आली असून बहुतांश दुकानात विनापरवाना फटाक्यांची विक्री होत असल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर नेहरू चौक परिसरात अनेक फटाक्यांची दुकाने असून दुकानात विनापरवाना फटाक्यांचा साठा ठेवण्यात आल्याची चर्चा ऐन सणासुदीच्या काळात होत होती. दरम्यान उल्हासनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतना बागुल यांच्या पथकाने सोमवारी पहाटे पावणे तीन वाजता नेहरू चौकातील युनिव्हर्सल ट्रेडर्स फटाक्याच्या दुकानात धाड टाकून तब्बल ४३ लाख २७ हजार ५७७ रुपयांचा फटाक्यांचा साठा जप्त केला. शहरात प्रथमच एवढ्या मोठ्यां प्रमाणात फटाक्यांचा साठा धाड टाकून जप्त करण्यात आला.
याप्रकरणी हरेश राजवानी व अमरजीत राजवानी या बापलेकावर उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहरू चौकासह शहरात वर्दळीच्या ठिकाणी फटाक्यांची दुकाने असून दुकानात परवानगी पेक्षा जास्त फटाक्यांचा साठा ठेवला जात असून या दुकानदारांची नागरी रहिवासी क्षेत्रात फटाक्याची गोदामे असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी वेळीच कारवाईची मागणी होत आहे.
शहरातील नेहरू चौक, कॅम्प नं-४ व ५ बाजारपेठ व अन्य ठिकानी दसरा व दिवाळी सणा समोर फटाक्यांची दुकाने सजली आहेत. या दुकानातून फटाके विकत घेण्यासाठी ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड व ग्रामीण परिसरातून घाऊक दुकानदार व नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. कोट्यवधीची उलाढाल दसरा दिवाळीच्या सणादरम्यान होत असून रात्रभर फटाक्यांची दुकाने मागल्या दारातून सुरू असतात. ऐन सणासुदीच्या काळात फटाक्याच्या दुकानाला आग लागल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बाजारपेठेत व वर्दळीच्या ठिकाणी फटाके दुकानाला महापालिका अग्निशमन विभाग व पोलीस विभागाने, ना हरकत परवाना दाखला दिलाच कसा? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
शहरातील बाजारपेठ फटाक्याच्या स्फोटकावर शहरात जीन्स, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, कपडे मार्केट प्रमाणे फटाक्याचे मार्केट प्रसिद्ध आहे. कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या फटाक्याची दुकाने बाजारपेठेत व वर्दळीच्या ठिकाणी असल्याने, बाजारपेठे फटाक्यांच्या स्फोटकावर असल्याचे बोलले जात आहे. महापालिका व पोलिसांनी वेळीच कारवाई करण्याची मागणी होत आहे.