धीरज परब
मीरारोड - वाढलेले हवेतील प्रदूषण व ध्वनिप्रदूषण पाहता मीरा भाईंदर महापालिकेने फटाके फोडण्यासाठी रात्री ७ ते १० हि वेळ निश्चित केली असताना देखील त्याला काडीचे महत्व न देता रविवारी दिवाळी दिवशी बहुतांश लोकांनी सायंकाळ पासून मध्यरात्र उलटून गेल्या नंतर सुद्धा सर्रास कानठळ्या बसवणारे फटाके फोडले . यामुळे मोठे वायू प्रदूषण झालेच पण ध्वनी प्रदूषण होऊन लोकांना त्रास सहन करावा लागला . तर फटाक्यां मुळे तब्बल ३२ ठिकाणी आगी लागल्या असून त्यात ४ घरांना व एका दुचाकीला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे .
महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी आदेश काढून दिवाळी निमित्त रात्री ७ ते १० वाजे पर्यंतची वेळ मर्यादा फटाके फोडण्यासाठी दिली होती . त्यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा विचार करून रात्री ८ ते १० ह्या दोन तासांची वेळ फटाके फोडण्यास दिली .
तसे असताना मीरा शहरात मात्र रविवारी दिवाळी दिवशी सायंकाळ पासून मध्यरात्री उलटून गेल्या नंतर देखील कानठळ्या बसवणारे फटाके फोडले जात होते . शहरातील रुग्णालय , शाळा , धार्मिक स्थळं आदी शांतता क्षेत्रात सुद्धा फटाके फोडले गेले . पोलीस वा पालिकेचे कोणीही कारवाई करत नसल्याने मध्यरात्री नंतर सुद्धा फटाके फोडले गेले .
मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने सर्वत्र घातक धुराचे साम्राज्य पासून अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता . तर अनेकांना मोठ्या आवाजा मुळे त्रास होऊन रात्रीची झोप सुद्धा पूर्ण करता आली नाही . रुग्ण , लहान बाळ, गर्भवती स्त्रिया, वृद्ध आदींना जास्त त्रास सोसावा लागतो .
तर फटाक्यां मुळे रविवारच्या रात्री तब्बल ३२ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत . त्यात जय अंबे नगर , इंद्रलोक , कनकिया भागातील कांदळवन क्षेत्रात आगी लागल्या . कांदळवनातील ३ ठिकाणीच्या आगी अग्निशमन दलाने विझवल्या .
फटाक्यां मुळे कचरा वा ज्वलनशील वस्तूं आगी लागल्या . ४ घरांना फटक्यां मुळे आगी लागल्या . सदर आगी ह्या रॉकेट फाटक्या मुळे लागल्या आहेत . त्यातील मीरारोडच्या सिल्वर सरिता भागातील पृथ्वी प्राईड ह्या २२ मजली टॉवरच्या १८ व्या मजल्यावरील सदनिका रॉकेट फटाक्याच्या आगीने मध्यरात्री जळून खाक झाली . मोठी आग लागल्याने इमारतीतील रहिवाश्याना बाहेर काढण्यात आले तसेच वीज पुरवठा खंडित करण्यात आला . अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली . यात लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले . भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर फटाक्या मुळे दुचाकी जाळून खाक झाली .
शासन , कायदे नियम , न्यायालयीन आदेश चे उल्लंघन करून मीरा भाईंदर महापालिकेने शहरात नियमबाह्यरीत्या भर रस्त्या लगत प्रचंड प्रमाणात फटाके स्टॉल ना परवानग्या दिल्या आहेत . फटाक्यांनी घातक वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होत असताना ते कमी करण्या ऐवजी महापालिकेने व पोलिसांनी सर्रास फटाके स्टॉल ना परवानग्या दिल्या . त्यामुळे मर्यादेचे उल्लंघन करून फटाके फोडण्यासह वाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणास तसेच आगी लागून झालेल्या नुकसानीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे .