ठाणे : ग्लोबल वॉर्मिंगचे संकट अधिकाधिक गहिरे होत असतानाच ठाणे जिल्ह्यातील येऊर, तुंगारेश्वर, तानसा, भातसा, माळशेज, घाटघर येथील जंगलात मानवनिर्मिती अथवा वीज कोसळून किंवा झाडांच्या घर्षणातून वणवा पेटण्याचे प्रकार वाढले आहेत. वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होऊ नये याकरिता वन विभागाने जंगल परिसरात वास्तव्य करणाऱ्यांच्या समित्या स्थापन केल्या आहेत. वणवा लागल्यास तो लवकरात लवकर कसा विझवायचा, याचे प्रशिक्षण या नागरिकांना दिले आहे. जाळपट्टे तयार करुन धसईच्या जंगलात लागलेला वणवा स्थानिकांनी तातडीने विझवला. भविष्यात ठिकठिकाणी याच माध्यमातून वनसंपदेचे रक्षण केले जाणार आहे.
ठाणेकरांचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलात चोरवाटांनी शिरकाव करणाऱ्यांकडून वेळोवेळी वणवे लावण्याच्या घटना घडतात. मुंबई-नाशिक महामार्गाला लागून असलेल्या भातसा, तानसा अभयारण्य परिसरातही मानवनिर्मित वणवे लावले जातात. शहापूर तालुक्यातील खर्डी, पाशाळा, विहिगाव, डोळखांब, धसई आदी जंगलातील वणवे रोखण्यासाठी उपवनसंरक्षक सचिन रेपाळ, वनरक्षक योगेश पाटील, विनोद लबडे आणि सहकाऱ्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप करुन कुठे वणवा लागला तर लागलीच इतरांना जागरूक करण्याची व्यवस्था केली. दोन दिवसांपूर्वी मुरबाड तालुक्यातील शिरवाडी गाव परिसरातील जंगलात पाच बाय पाच फुटांचे जाळपट्टे स्थानिकांनी तयार केले. येथील जमीन जाळून टाकल्याने वणवा लागला तरी जाळपट्ट्यापर्यंत येऊन थांबतो व विझतो. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता वनविभागाने जंगल परिसरात सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (सीएफआर) स्थापन केल्याची माहिती रहिवासी राजेंद्र सोनगळ यांनी ‘लोकमत’ला दिली. शिरवाडी येथील १५० हेक्टर वन जमिनीचे वणव्यापासून रक्षण करण्याची जबाबदारी समितीवर सोपवली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख शहरे एकीकडे खाडीने तर दुसरीकडे भल्यामोठ्या जंगलांनी वेढली आहेत. केंद्रीय वनविभागाकडून स्थानिक वन अधिकाऱ्यांना ‘फायर अलर्ट’ ही ऑनलाइन यंत्रणा केंद्राच्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती धसई वनरक्षक पाटील यांनी दिली. वणवा विझवण्यासाठी अत्याधुनिक एअर ब्लोअरच्या बॅकपॅकसह पाण्याच्या फवारणीचे पंप आणि झाडाच्या फांद्याचा वापर केला जात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. स्थानिकांनाही प्रशिक्षित करून जनजागृती केली आहे.
यामुळे लागतो वणवा
वणवा का लागतो याबाबत सेवानिवृत्त वनाधिकारी प्रवीण पाटील म्हणाले की, आकाशातून वीज कोसळली, झाडांचे घर्षण झाले तर नैसर्गिक कारणास्तव वणवा लागतो. बेफिकिरीने फेकलेली जळती सिगारेट/विडी अथवा फेकलेली जळती माचीसची काडी, शेतीसाठी पेटवलेल्या पालापाचोळ्यामुळेही वणवा लागतो. ही व अशी मानवनिर्मित वणव्याची कारणे आहेत. मात्र वणव्यांमुळे वन्य पशुपक्षी, त्यांची निवासस्थाने, औषधी वनस्पती, चारा, गवत जळून भस्मसात होते.