मीरारोड - भारतीय विस्फोटक कायदा आणि उच्च न्यायालयाचे आदेशाला न जुमानता फटाके विक्रेत्यांना बक्कळ फायदा करून देण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने चक्क सुरक्षेचे नियमच बासनात गुंडाळून टाकत मोठ्या मोकळ्या मैदानां ऐवजी रहदारीच्या रस्त्यालगत दाट वस्ती मध्ये फटाके विक्रीचे परवाने दिले आहेत.
भारतीय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिका व पोलीसांना बंधनकारक आहे. त्यातच फटाके हे अतिशय ज्वलनशील असल्याने या आधी फटाके दुकानांना आगी लागुन झालेल्या जीवघेण्या दुर्घटना पाहता फटाक्यांच्या विक्री स्टॉल करीता काटेकोर नियम व निकष मुंबई उच्च न्यायालयाने घालुन दिले आहेत.
फटाके विक्री करण्यासाठी मोकळ्या मैदानां मध्ये परवानगी देणे तसेच नागरी वस्ती वा रहदारीचे रस्ते आदी पासुन फटाके स्टॉल लांब असणे आवश्यक आहे . पत्र्याच्या शेडचे स्टॉल तसेच तेथे अग्निशामक यंत्रणा बंधनकारक असते . यंदा पालिकेने १५४ फटाके स्टॉल ना परवानगी दिली आहे .
महापालिकेने भाजपचे माजी नगरसेवक रजनीकांत मयेकर यांच्या मयेकर मैदानाच्या नावाखाली प्रत्यक्षात कोणतेच मैदान नसताना भर रस्त्या लगत फटाके विक्रीचे ५ स्टॉल ना परवानगी दिली आहे . तसाच प्रकार भाईंदरच्या इंद्रलोक नाका, सिंघानिया मैदान , महेश नगर , शिवसेना पदाधिकारी धनेश धर्माजी पाटील यांचा प्लॉट , गुप्ता ग्राउंड, ओस्तवाल गार्डन , क्रॉस गार्डन तर मीरारोडला रेल्वे स्थानक जवळील मार्केट, सिल्व्हरपार्क विजय सेल्स जवळ , जांगीड सर्कल आदी भागात केलेला आहे .येथे कोणतेच मैदान नसताना तसेच रस्त्यालगत व दाट वस्ती मध्ये ह्या फटाके स्टॉल ना परवानग्या दिल्या आहेत .
आश्चर्य म्हणजे पालिकेने पंडित भीमसेन जोशी रुग्णालया समोरील भूखंडात मैदानाच्या नावाखाली रस्त्यालगत ८ फटाके विक्री स्टॉल परवाने दिले आहेत . एकूणच पालिकेच्या काही मोठ्या मैदानांचा अपवाद वगळता रहदारीच्या रस्त्यांलगत, नागरी वस्ती मध्ये तसेच मैदानं नसताना देखील बेधडक फटाके विक्री स्टॉलना परवानग्या दिल्या आहेत.
नागरीकांच्या जीवाशी खेळत कायदे - नियम धाब्यावर बसवून केवळ मूठभर लोकांचा फायदा करून देण्यासाठी लोकांचे जीव धोक्यात घालणे गंभीर आहे . त्यामुळे फटाके विक्री परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. तर अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे म्हणाले कि , आपल्या कडे फटाके विक्रीच्या सदर जागांची यादी आलेली आहे . आपण अजून अग्निशमनचा परवाना कोणाला दिलेला नाही . या प्रकरणी उपायुक्तांशी चर्चा करणार आहे .