मीरारोड - नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेले भारतिय विस्फोटक कायदा आणि उच्च न्यायालयाचे आदेशच पालिकेने फटाका विक्रेत्यांना बक्कळ फायदा करुन देण्यासाठी धाब्यावर बसवले आहेत. महापालिकेने फटाके विक्रीचे स्टॉल मोकळ्या मैदानात न देता चक्क निवासी भागात व रस्त्याला लागुन दिलेले असुन या फटाके विक्री स्टॉल परवानगी घोटाळ्या प्रकरणी पालिका अधिकारायांवर कारवाईची मागणी होत आहे.फटाके हे अतिशय ज्वलनशील असल्याने या आधी फटाके दुकानांना आगी लागुन झालेल्या जीवघेण्या दुर्घटना पाहता फटाक्यांच्या विक्री स्टॉल करीता काटेकोर नियम व निकष मुंबई उच्च न्यायालयाने घालुन दिले आहेत. शिवाय भारतिय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिकेला व पोलीसांना बंधनकारक आहे.भारतिय विस्फोटक कायदा आणि उच्च न्यायालयाचे आदेश सर्रास धाब्यावर बसवुन महापालिकेने फटाका विक्रेत्यांना बक्कळ फायदा करुन देण्याचा भन्नाट प्रताप केला आहे. फटाके विक्री करण्यासाठी मोकळ्या मैदानां मध्ये परवानगी देणे बंधनकारक असुन नागरी वस्ती वा रहदारीचे रस्ते आदी पासुन लांब असले पाहिजेत. पत्र्याच्या शेडचे स्टॉल तसेच अग्नीशामक यंत्रणा आदी उभारणे आवश्यक आहे.परंतु महापालिका प्रशासन व अग्नीशमन दलाच्या वतीने मात्र भर रहदारीच्या रस्त्यांलगत, नागरी वस्ती मध्ये तसेच मैदानं नसताना देखील बेधडक फटाके विक्री स्टॉलना परवानग्या दिल्या आहेत. भार्इंदर पुर्वेला तर राहुलपार्क, बाळाराम पाटील मार्ग, विमल डेअरी मार्ग, नवघर मार्ग, इंद्रलोक मार्ग आदी अनेक ठिकाणी भर रस्त्या लगत व नागरी वस्तीत फटाक्यांचे स्टॉल लागले आहेत. तीच स्थिती भार्इंदर पश्चिम, मीरारोड, काशिमीरा भागातली आहेत. या मुळे दुर्घटना घडल्यास नागरीकांची मोठ्या प्रमाणात जिवीत वा वित्त हानी होण्याची शक्यता आहे. फटाके विक्रत्यांना बक्कळ फायदा करुन देण्यासह या मागे काही राजकिय मंडळी देखील गुंतली असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.या प्रकरणी पालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगीतले की, गेल्या वर्षी दिलेल्या परवानग्यां प्रमाणेच यंदा देखील फटाके विक्री स्टॉलना परवानगी दिली आहे. विनापरवानगी वा नियमांचे उल्लंघन असेल तर प्रभाग अधिकारी व अग्नीशमन दलास कारवाई करण्यास सांगीतले आहे. परंतु सदर परवानग्या नियमा नुसार मोकळ्या मैदानात नसुन रस्त्या लगत व निवासी भागात असल्या बद्दल विचारणा केली असता लहाने यांनी गेल्या वर्षी प्रमाणेच परवानग्या दिल्याचे सांगुन अधिक बोलणे टाळले.नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगीतले की, पोलीसां कडुन या बाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत. परवाने देण्याचे अधिकारी महापालिकेला असुन पालिकेने देखील नियम - आदेशांचे काटेकोर पालन केले पाहिजे.फटाका विक्री स्टॉलसाठी परवानगी देताना मोठा आर्थिक गैरव्यव्हार झाल्या शिवाय असे नियमबाह्य पणे स्टॉलना परवानग्या देणे शक्यच नसल्याचा आरोप भावेश पाटील या नागरीकाने केला आहे. मुंबई उच्च न्यायालय व भारतिय विस्फोटक कायद्याचे उल्लंघन करुन फटाके विक्रेत्यांच्या बक्कळ फायद्यासाठी नागरीकांच्या जीवाशीपालिका आणि पोलीसांनी खेळ चालवला आहे. तो तातडीने थांबवुन जबाबदार पालिका आणि अग्नीशमन दलाच्या अधिकारायांवर कारवाईची मागणी पाटील यांनी केली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेचा फटाके स्टॉल परवाना घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 10:25 PM