ठाणे : औरंगाबाद येथे फटाक्यांच्या स्टॉलला लागलेल्या भीषण आगीनंतर ठाण्यातील फटाक्यांचे स्टॉलदेखील रडारवर आले आहेत. परंतु, फटाक्यांच्या स्टॉलच्या ठिकाणी सुटसुटीतपणा आणि स्टॉलचालकांनी घेतलेल्या काळजीमुळे सध्यातरी ठाण्यातील फटाक्यांचे स्टॉल संकटाबाहेर असल्याचा दावा पालिकेच्या अग्निशमन विभागाने केला आहे.औरंगाबाद येथे लागलेल्या भीषण आगीत सुमारे २०० दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली असून ठाण्यातील फटाक्यांची दुकानेदेखील यानिमित्ताने रडारवर आली आहेत. ठाण्यात फटाक्यांचे मोठे मार्केट म्हणून कोपरीच्या मार्केटकडे पाहिले जाते. या ठिकाणी दिवाळीच्या १० दिवस आधीपासून फटाके खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते. पाच वर्षांपूर्वी येथे दाटीवाटीने फटाक्यांची दुकाने व्यापली गेली होती. विशेष म्हणजे २० किलोंचा तात्पुरता परवाना घेऊन १०० किलोंहून अधिकचे फटाके ठेवले जात होते. त्यामुळे ही बाब आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या ठिकाणी केवळ ज्यांच्याकडे कायमस्वरूपी फटाक्यांचा परवाना आहे, त्यांचेच स्टॉल येथे लावण्यास परवानगी देण्याचे निश्चित केले. तर, उर्वरित २० ते २५ स्टॉल संत तुकाराम महाराज मैदानात हलवले. ही परवानगी देताना काही अटीदेखील घातल्या असून त्यानुसार फायर ब्रिगेडकडून आग विझवण्याचा एक बाटला घ्यावा, स्टॉलची उभारणी पत्र्यांची असावी आणि मातीच्या दोन बाटल्या प्रत्येक स्टॉलधारकाने ठेवाव्यात, अशा काही अटी घातल्या. या नियमांचे सध्या तंतोतंत पालन होत असून ज्या ठिकाणी २० हून अधिक स्टॉल्स असतील, त्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांसाठीदेखील एक टेण्ट उभारला जात असून त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचे दोन कर्मचारी तैनात असतात. याशिवाय, आग लागू नये, या उद्देशाने प्रत्येक स्टॉलचालकाने २०० लीटरचा पाण्याचा ड्रम भरून ठेवणे क्रमप्राप्त केले आहे. तसेच १० प्रभाग समित्यांच्या सहायक आयुक्तांना आग लागल्यास काय करावे आणि काय करू नये, यासंदर्भातील ३३ प्रकारच्या सूचना दिल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. (प्रतिनिधी)उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोपरीतील ८ फटाके विक्रेत्यांना परवाना रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसेच शहराच्या विविध भागांत मैदान अथवा मोकळ्या भूखंडांवर लावलेल्या स्टॉलच्या ठिकाणी आगप्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.-शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपाऔरंगाबादच्या सर्वात मोठ्या फटाका मार्केटला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात दिवाळीनिमित्त ठाणे महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या विविध मैदानांतील फटाका विक्री केंद्राजवळ सक्षम अग्निशमन यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.-मनोज शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस
फटाके स्टॉल धोक्याबाहेर, ठामपाचा दावा
By admin | Published: October 30, 2016 2:32 AM