ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरित लवादानेच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीसह १८ शहरांमध्ये फटाके वाजविण्यास बंदी केली आहे. यामध्ये ठाणे कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरसह बदलापूरचादेखील समावेश आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आधीच फटाके स्टॉलला परवानगी नाकारली आहे. यामुळे ठाण्यासह, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये सुमारे ५५० स्टॉलवर संक्रांत आली आहे.
कोरोनाचा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे अशा रुग्णांना फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास होण्याचा दावा समाज माध्यमांवर केला जात असून ठाण्यातील काँग्रेस पक्षाने दिवाळीत फटाकेविक्री आणि वाजविण्यास बंदी घालण्याची मागणी केली होती. मुंबई महापालिकेने त्यानुसार फटाकेबंदी केली आहे. परंतु, ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांनी तशी कोणतेही पावले उचलली नव्हती. आता वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सर्व प्रकारच्या फटक्यांची विक्री व फटाके वाजविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली असून ती ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.
ठाणे मनपा हद्दीत दरवर्षी २५० च्या आसपास स्टॉलला परवानगी दिली जाते. परंतु, यंदा महापालिकेने तशी प्रक्रियाच सुरू न केल्याने एकही अर्ज पालिकेकडे आलेला नाही. त्यामुळे महापालिकेचा भार हलका झाला आहे. परंतु, कोपरीत कित्येक वर्षांपासूनची फटाकेविक्रीची दुकाने मात्र सुरूच राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे उल्हासनगरमध्ये मात्र पालिकेची परवानगी न घेताच रस्त्यांवर फटाके विक्रीची स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवर आता पालिकेला कारवाई करावी लागणार आहे. एकूणच ठाण्यासह, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर भागात दरवर्षी लागणारे ५५० च्या आसपास फटाके विक्रीचे स्टॉल यंदा मात्र लागणार नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळे ठाणेकरांची दिवाळी यंदा हवाप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणमुक्त साजरी होणार आहे.