अंबरनाथ : अंबरनाथ शहर महिला अध्यक्षा सुजाता भोईर यांच्या नातेवाइकाने देवीच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना दोन वेळा हवेत गोळीबार केल्याचे समोर आले आहे. स्वत: भोईर यांच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. गोळीबार करणारी व्यक्ती भोईर यांची जवळची नातेवाईक आहे.भोईर आणि त्यांचे नातेवाईक एका मिरवणुकीत नाचतानाचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ १ आॅक्टोबरचा असून सायंकाळी देवीच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. नाचताना हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओ भोईर यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना काढण्यास सांगितले होते. हा व्हिडीओ लागलीच फेसबुकवर टाकला. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती आशीष भोईर नावाची असून ती सुजाता भोईर यांची जवळची नातेवाईक आहे. हा सर्व प्रकार भोईर यांच्यासमोर घडलेला असतानाही तो प्रकार रोखण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही.चार महिन्यांपूर्वीच अंबरनाथच्या गायकवाडपाडा येथे नाचताना तरुणांनी चालवलेल्या बंंदुकीतून सुटलेली गोळी समोर बसलेल्या एका १३ वर्षांच्या मुलाला लागून त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका बड्या राजकीय नेत्याच्या दोन्ही मुलांना अटकही झाली होती. असे असतानाही मिरवणुकीत भरगर्दीत पुन्हा गोळीबार झाल्याने पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हे समोर आले आहे.यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, आशीष यांना बंदुकीचा परवाना दिला आहे. त्यामुळे ज्या बंदुकीतून गोळीबार झाला, ती बंदूकपरवानाधारक आहे. मात्र, परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार करणे किंवा सण, उत्सवात गोळीबार करणे, हा गुन्हा आहे. यासंदर्भात सुजाता भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.
अंबरनाथमध्ये विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार, व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:27 AM