भिवंडी : मुंबई - नाशिक महामार्गावरील राजनोली नाका येथे स्वीट हार्ट लेडीज बारचालकावर मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने गोळीबार केला. अमोल बोºहाडे असे जखमी बारचालकाचे नाव आहे. त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. कोनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.भिवंडी तालुक्यातील राजनोली ग्रामपंचायत हद्दीत स्वीट हार्ट नावाचा लेडीज बार आहे. मध्यरात्री अमोल हे सिगारेट पिण्यासाठी बारच्या मागील बाजूस येऊन उभे राहिले असता तेथे दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्याच सुमारास अमोल हे मागे वळाल्याने गोळी त्यांच्या उजव्या खांद्याच्या खालील बाजूने घुसून समोरून बाहेर पडली. दरम्यान, अमोल हे धावतच बारमध्ये गेल्यामुळे मारेकऱ्याने तेथून पळ काढला. राजनोली नाका परिसरात असलेल्या खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना उपचारासाठी ठाण्यात दाखल केले आहे.घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्याचा पंचनामा केला. बारमधील नोकर मोहम्मद कासीम मो. तौफिक मन्सुरी याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळाला पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. दरम्यान, हल्ला कोणी व का केला हे कारण अजून समजू शकलेले नाही.
भिवंडीत लेडीज बारचालकावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 5:55 AM